Wednesday, May 31, 2017

पाणीपुरी


पाणीपुरी सारखी वागतात
स्वप्नं देखील कधीकधी
काही ढासळतात
ओठांशी नेता नेता
अनपेक्षित पणे हातातच
अन मग सलत रहातात
परीटघडीच्या शर्टावरल्या
डागांसारखी आयुष्यभर
तर काही
झणझणीत ठसका देतात
प्राण कंठाशी येऊन
डोळे डबडबून येईस्तो
ब्रह्मांड दाखवतात
त्या तेवढ्या एका
क्षणातच
- गुरु ठाकूर 

Monday, May 29, 2017

घुमट


कधी रखरखत्या ऊन्हात 
तर कधी मुसळधार पावसात
आपापल्या कारणांसाठी
त्याच्या वळचणीला 
रेंगाळलेली पाखरं
दिवस मावळताच 
परत जातात आपापल्या
ऊबदार घरट्यांत तेव्हा 
त्या रिकाम्या वळचणींतला
एकांत अंगभर माखून
एखाद्या योग्यासम बसलेल्या 
त्या मंदिराच्या घुमटातून
मालकंस पाझरल्याचा भास 
होत रहातो अनेकदा 
माझ्या जडावणा-या पापण्यांना
आमच्यात काहितरी विलक्षण 
सख्य असावं नक्की….
- गुरु ठाकूर

Saturday, March 18, 2017

काटा

या देहाचा कोष भेदूनी
वाटे डोही चिरंतनाच्या 
झोकून द्यावे..
पण आत्म्याच्या खोल मुळाशी
रुतल्या पारंब्या मोहाच्या
काय करावे
गूढ कोठली काजळमाया
सांगे आता  उचला गाशा
शिणल्या थकल्या गात्रांमधूनी
वैराग्याचा वाजे ताशा
छिन्न पाउली परि ठुसठुसतो
 स्वार्थाचा हा छचोर काटा
कसे निघावे?

 - गुरु 

Monday, March 6, 2017

अथांग

अथांग डोहासारख्या त्याच्या अस्तित्वाने 
तिला अनेकदा बेचैन करुन सोडलेलं..
तिने त्याच्या प्रतलावर  खळबळ निर्माण व्हावी 
या आशेने अनेक दगड भिरकावले..
पण केवळ क्षणीक तरंग उठावे अन नाहिसे व्हावे
 इतकेच घडले..पुन्हा डोह निर्विकार..
त्याग अथांगतेत तल्लीन होत तळाच्या दिशेने 
जाणा-या दगडांचा मग तिला हेवा वाटू लागे.
आपल्या अस्तित्वाचा दगड 
भिरकावून देता आला असता त्याच्या गूढ गहनतेत तर?
मग तिला जाणवत राही 
रुढींच्या रेताडीत रुतलेला तिचा अंश...
तो मोकळा होइल का याचा अदमास काढायच्या प्रयत्नात 
तिला जाणवला  परंपरांच्या पारंब्यांनी घातलेला विळखा
तो सुटणार नाही. .आणि तोडणे तिच्या स्वभावाला धरुन नव्हते..
ती विकल झाली पण 
त्याच क्षणी मेघांच्या गवाक्षातून निसटलेले किरण 
तिच्या चेहर्यावर विसावले. दिपलेली नजर तिने खाली वळवली 
अन शहारलीच..
तेजाने उजळेलं तिचं रुप डोहाच्या तळाशी निवांतपणे विसावलेलं..
अगदी तिला हवं तसंच... 
त्या क्षणी ती स्वतः त्या आभासाच्या  स्वाधीन करून मोकळी झाली. ..

उत्खनन

कलावंताने, 
प्रतिभेची पालवी आटून 
मोहर झडू लागलल्याची 
चाहुल लागताच
आत्मपरीक्षणाची पहार घेऊन
खणायला सुरवात करावी.
आपल्याच मुळाशी 
निबर झालेल्या यशाचे अहंगड 
नाहीतर अपयशाचे न्यूनगंड
 गुठळ्या होऊन तिथे घट्ट चिकटलेले दिसतील 
 त्याना तिथून तातडीने हूसकावणं गरजेचं आहे
वास्तवाच्या काठीने
कारण  त्यांच्या मगरमिठीतून 
मुळांची मोकळिक नाही झाली 
तर उभं झाड करपायला वेळ लागत नाही
 - गुरु ठाकुर