Showing posts with label चिंतन. Show all posts
Showing posts with label चिंतन. Show all posts

Tuesday, November 21, 2017

पांथस्थ

" ऊठ, रखरखाटाने पोऴेलया  पांथस्थाला सावल्यांची स्वप्न पडणे स्वाभाविक आहे. सावली देणे हा झाडांचा धर्म तो ते इमाने इतबारे पाळते असते पण म्हणून सावली करता थांबलेल्या पांथस्थाने झाडाशी घरोबा करू नये . जे सावलीत रमतात त्यांचा प्रवास खुंटतो, शिवाय मुक्काम म्हटला की विस्ताव आला  अन् विस्तव म्हटलं की झळ आली. झाडाला झळ सोसत नाही  कारण त्यांच्या मनात पिढीजात वणव्याचा धसका  दबा धरुन असतो त्यामुळे झाडाने तसं नाकरण्याआधीच पांथस्थाने पथिक व्हावं .
              तसं पाहायला गेलं  तर पंथांशी अस्तापर्यंत जोडला राहाणं हा पांथस्थाचा वसा… त्याला मुक्कामाची मुभा नसते पदरात पडलेल्या सावली करता झाडांचे आभार मानून त्याने पुढल्या प्रवासा करता निघावं यातच शहाणपण असतं …. "
त्याने डोळे उघडले तेव्हा त्याच्या लक्षात आलं पारावरल्या झुळुकेनं त्याचा डोळा लागला होता…त्याच्या उशाशी  शेंदरी दगडाखेरीज कुणीच नव्हतं पण मग, ते कोण बोललं?? 
     भानावर आला तरी ते शब्द त्याच्या कानात रुंजी घालत होतेपंथांशी अस्तापर्यंत जोडला राहाणं हा पांथस्थाचा वसा… त्याला मुक्कामाची मुभा नसते पदरात पडलेल्या सावली करता झाडांचे आभार मानून त्याने पुढल्या प्रवासा करता निघावं यातच शहाणपण असतं “ का कोण जाणे त्याला त्या पडक्या मंदिरातला संन्यासी आठवला .तो असंच काहीबाही बोलायचा .त्याने कृतज्ञ नजरेने झाडाकडे पाहिले झाड मात्र घरटे टाकून गेलेल्या पाखरांच्या प्रतीक्षेत हरवल्या सारखं उभं होतं.  मुक्कामाचा मोह अनावर होण्या आधीच प्रस्थान करायला हवे  असा विचार करून तो उठला. झाडाकडे पाठ करुन चालू लागल्यावर देखील एकदा वळून पाहण्याचा मोह तो टाळू शकला नाही

      त्याने एकदा झाडांकडे वळून पाहिले वाऱ्याने हलणारी एक भली मोठी फांदी जणू आपल्या करता शुभास्ते पंथान संतु म्हणत  निरोपाचा हात हलवत आहे असा भास त्याला झाला .
-गुरु ठाकूर

Friday, March 3, 2017

कलावंत अन निर्मिती

निर्मितीचं  वरदान प्रत्येकालाच लाभतं असं नाही आणि लाभलेल्यांपैकी प्रत्येकाला ते मानवतं असं नाही कारण कलावंत म्हणून निर्मितीतलं ताजेपण जपणं ही सहज गोष्ट नाही.आपल्याला अनेकदा काही कसलेले कलावंत सहजपणे एखाद्या कलाकृतीला जन्म देताना दिसतात पण त्या सहजते मागे त्यांची साधना असते जसा शांतपणॆ जलाशयावर विहार करणारा राजहंस पाहताना त्याचे पृष्ठभागाखाली अतिशय वेगाने पाणी कापणारे पाय आपल्याला दिसत नाहीत त्यामुळे आपण थक्क होतो हे पृष्ठ्भावरलं सादारीकरण  तोवरच सफाईदार दिसतं जोवर पायांचं कार्य अथक सुरु आहे.कलाकृतीतला ताजेपणा अन नाविन्यही तसंच जोवर कलावंताची नाविन्याची भूक अन त्याकरता झोकून देण्याची आस धगधगत आहे तोवरच ती टीकून रहाते. पण अनेकदा अचानक्पणे मंदावते.निर्मितीच्या ध्यासाने झपाटलेला कलावंत पहाता पाहता भरकटतो अन दिशाहिन होत जातो.याला कारण यश.सिद्धी पेक्षा प्रसिद्धीचा मुकुट मोठा असला की तो घसरून डोळ्यावर येतो.अन दृष्टीभ्रम निर्माण करतो.कालच्या ्गेल्या पावसाळ्यावर यंदाचं पीक तगत नसतं याचा त्याला विसर पडतो.स्वत:ची अत्युत्तम निर्मिती क्षणात विसरु्न जो नवनिर्मितीच्या ध्यासात हरवू शकतो तो खरा कलावंत. आधीच्या ्यशस्वी भूमिकेची झूल उतरवून विवस्त्रपणे नव्या भूमीकेत शिरण्याचं शास्त्र ज्याला उमगलं तो कलावंत. याकरता विवेकासारखा सारथी सोबत असवा लागतो.यशाच्या रथावर स्वार होताना विवेकासारखा सारथी नसेल तर रथाचे वारू चौफेर उध्ळून तुमची फरपट करायला वेळ लावत नाहीत.

सृजनाचा बहर उमलता ठेवण्याकरता संवेदनांचं कोवळेपण जपणं ही देखील कलावंताकरता तारेवरची कसरतच  असते. तरच श्वासातली लय अन ध्यासातला ताल कवेत घेता येतो.स्पर्शाची भाषा अन अश्रुंची लिपी कळलीच नाही तर तिचा अनुवाद तरी कसा करणार? ज्या कलावंताना ही उमगते त्यांच्या निर्मितीत त्याचे कवडसे दिसत रहातात. सामान्यातल्या सामान्य रसिकाची नाळही त्या कलाकृतीशी सहज जुळते.अन कलाकृती अजरामर होवून बसते.अशा वेळी कलाकृतीचं यश कलाकृतीच्या पायाशी सोडून पुढ्ल्या प्रवासाला निघावं सोबतीला यशाची धग घ्यावी रग नाही.
--

Friday, November 28, 2014

भक्ति आणि प्रेम .


“भक्त” या शब्दात मोठी गंमत आहे. मुळात भक्त म्हणजे काय? तर जो विभक्त नाही. ’विभक्त’ म्हणजे ’Departed’  असेल तर ’भक्त’ याचा अर्थ एकरुप झालेला असा होतो. अर्थात भक्ती म्हणजे एकरुप होण्याची प्रक्रिया. एकरुप होण्याकरिता जवळ येण्याची गरज असते किंवा जवळ येणं ही एकरुप होण्याची पहिली पायरी समजू. अर्थात हे ’जवळ येणं’ म्हणजे काय? तर अंतर नाहीसं करणं. हे अंतर दोन प्रकारचं असतं. एक जे डोळ्यांना दिसतं. ज्याला ’Physical Distance’ असं म्हणतात.आणि एकरुप होण्याकरता ही दोन्ही अंतरं एकाचवेळी नाहीशी होणं गरजेचं असतं. देवळासमोरच्या रांगेतला शेवटच्या टोकाचा माणूस आणि गाभा-यातली मूर्ती यांच्यात अंतर आहे. रांग संपली, तो गाभा-यात पोहोचला. ‘Physical Distance’ कमी झालं. पण आतलं अंतर?? ज्याला ‘Inner Space’ म्हणतात. त्याचं काय? रांगेच्या शेवटच्या टोकाला येऊन तो उभा राहिला तेव्हा त्याचं साध्य होतं गाभा-यात पोचण्याचं, देवाला पाहण्याचं. तो त्या टोकाला उभा होता पण मनाने मात्र गाभा-यात होता. मग रांगेत रमला. तिथल्या लोकांशी रूळला, राजकारणावर चर्चा केली. तासभर वेळ काढता काढता अनेक चर्चा झाल्या. रांगेतला एकजण त्याचा व्यवसायबंधू निघाला, एक महत्वाचं ’Deal’ ठरलं. तासाभरात जर बाहेर पडलो तर आजच हे ’Deal’ साध्य होईल. आता तो घड्याळाकडे पाहतो. गाभा-यातल्या देवाला विनवतो, रांग संपू दे! लवकर ’Deal’  होऊ दे! ५ किलो पेढे देईन!......... साध्य बदललं !!!  मघाशी त्याचं साध्य होतं ’देव’. आता साध्य आहे ’Deal’ ! देव हे फक्त डील यशस्वी करण्याकरताचं एक साधन झालं आहे. म्हणजे शरीराने जेव्हा तो गाभा-यात पोहोचलाय तेव्हा मनाने तिथून कित्येक किलोमीटर दूर असलेल्या त्या ’Deal’च्या ठिकाणी पोहोचलाय.’Physical Distance’ संपलं पण ‘Inner Space’ ????. भेट झाली, पण भक्त आणि भगवंताची नाही कारण भक्त त्यापूर्वीच विभक्त झाला....  प्रेम आणि भक्ती यातलं हेच साम्य आहे. दोन्हीचं अंतिम रूप हे विरघळून जाणं आहे. मीपण टाकल्याशिवाय विरघळता येत नाही. मला काय हवंय हे सांगण्यापेक्षा तुला काय हवंय याचा विचार म्हणजे विरघळून जाणं! यात मी, माझं, मला रहातच नाही. इथेच प्रेम आणि भक्ती एक होते. मीरा कृष्णमय होऊन गेली. मीरेचं अस्तित्वच राहिलं नाही. ते समर्पण होतं. पण म्हणून आज मीराबाई म्हणून डोळे मिटले तर कृष्णाचं रुप डोळ्यासमोर येतं. भक्तीचा अंतिम चरण, जवळ येण्याचं अंतिम रुप म्हणजे एकरुप होणं ! प्रेमातही तेच असतं. दोन शरीरं एकत्र येतात तो "शृंगार’ असतो पण दोन मनं एकत्र येतात ते ’मीलन’ असतं. पण तरीही दोन्हीमधला ’मी’ शिल्लक असतोच. ज्याक्षणी हे दोन ’मी’ एक होतात, तो क्षण म्हणजे ’संगम’! एक विचार, एक तत्व झालं की एकरुपता येते.   रांगेतल्याचं तत्व आहे ’मागणे’, गाभा-यातल्याचं तत्व आहे ’देणे’. दोन वेगळी तत्व, एकरुपता कशी येईल? भक्ती कशी साध्य होईल त्याच्या तत्वाचा स्वीकार केल्याशिवाय? तो देण्यात विश्वास ठेवतो. दीनदुबळ्यांचा, रांजल्यागांजल्यांचा आधार होतो, हाकेला धावतो. आधार मागत नाही, आधार देतो. त्या तत्वाचा स्वीकार करणं ही पहिली पायरी आहे. नाही का? तत्व एक झालं, विचार एक झाला की ’मी’ विरघळू लागेल, आणि भक्त होण्याच्या क्रियेला सुरुवात होईल. ‘Inner Space’ कमी होत जाईल. ज्याक्षणी ती  ‘Inner Space’ संपली त्याक्षणी रांगेत उभं राहण्याची गरजही संपली. कुणाला भेटायला जायचं? तो आतच आलाय. काय मागायचं? मागणंच संपलंय...तत्व एक झालंय.. संगमाच्या दिशेने पडलेलं हे पहिलं पाऊल असेल.