Showing posts with label आठवणीतले क्षण... Show all posts
Showing posts with label आठवणीतले क्षण... Show all posts

Tuesday, July 7, 2015

कृष्ण लीला...





त्या चित्रप्रदर्शनातल्या प्रत्येक फ्रेममध्ये मी हरवून जात होतो. रंग, रेखा, मांडणी, याच्याही पलीकडे जाऊन गुरफटत होतो. विषय होता “कृ्ष्ण”!!! श्रीकृष्णाची अनेक रुपं त्या चित्रकारानं चितारली होती. ज्यातून श्रीकृष्णाच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू कॅन्व्हासवर जिवंत झाल्यासारखे वाटत होते. मुळात श्रीकृष्ण ही व्यक्तिरेखा मला नेहमीच भुरळ घालणारी वाटत आली आहे. कारण जितकं जवळ जावं तितकं अधिक गहन होत जाणारं ते कॊडं ! एखाद्याला प्रश्न पडावा, की यातलं खरं काय?
त्याच्या रंगाचंही तसच आहे..निळाच का? तर तो आकाशाचा रंग..आकाश म्ह्णजे काय तर जे आहे असं वाटतं पण नाहिये..आभासी पोकळीच नुसती..गुढ निळाई केवळ.पुराणात काही ठिकाणी त्याला काळा म्हटलंय..तो तर रंगच नाही...काळा रंग म्ह्णजे खोली depth.जीचा थांग लागत नाही.आपल्या आकलनाचा प्रकाश जिथवर पोचतो त्याच्या पलिकडे सगळा अंधारच की..
प्रत्येक चित्राशी थांबून माझी खात्री होत होती की मला त्याचं सर्वात भावणारं रुप बहुतेक हेच आहे. पण पुढच्या चित्राकडे वळताच माझं मत बदलत होतं. कळेना त्याचं खरं रुप कोणतं? खोड्या करणारं खट्याळ! जे सूरदासांना भावलं? की निरागस,भावुक,नटखट! गोपींची वस्त्रे लपवणारं शृंगाररसात भिजलेलं जे राधेला भावलं? की अत्यंत कुशल राजकारणी! जे भिष्माचार्यांनी ओळखलं? की महान तत्वज्ञ! जे अर्जुनाला दिसलं? की अनन्य साधारण भक्तिरसात चिंब होऊन भवतालात भरुन राहिलेलं! ज्यात मीराबाईला विलीन व्हावंसं वाटलं?
 एकाच कसलेल्या अभिनेत्यानं वेगवेगळ्या भूमिका इतकं समरस होऊन साकाराव्या की पाहणा-याला त्या त्या वेळी तो तसा तसा वाटावा. पण त्यापलीकडे या सा-या भूमिकांच्या पलीकडचा मूळ तो कसा आहे हे गूढच रहावं तसंच काहीसं. ती सारी चित्र डोळ्यात साठवून प्रदर्शनातून बाहेर पडलो. तो नेमका कसा असावा? डोक्यात विचारांचा गुंता भिरभिरु लागला. उत्तर काही सापडेना. आणि मग हा गुंता काव्याकार घेऊ लागला. जहांगीर आर्टस गॅलरीच्या पाय-या उतरतानाच ते काव्य पूर्णत्वालाही गेलं. मग त्या पाय-यांवर बसून ते टिपून काढलं. साहजिकच जहांगीर आर्टस गॅलरीच्या पाय-यांवर जन्माला येण्या़चं भाग्य त्याला लाभलं. ही देखील कृष्णलीलाच !!!!

तू रासातील राधेच्या मनमोहन कुंजविहारी
की भासातील मिरेच्या तू नटनागर गिरीधारी ....?

तू दिव्य कधी तू भव्य कधी
तू शृंगाराचे काव्य कधी
तू पार्थसारथी रणांगणातील
सार्थ सुदर्शन धारी?
की भासातील मिरेच्या तू नटनागर गिरीधारी ....?

तु रास रसिक यमुनेकाठी
अन बंधुसखा द्रौपदी साठी
मयसभेत भरल्या गहिवरला

तो भोळा शाम मुरारी

की भासातील मिरेच्या तू नटनागर गिरीधारी ....?

Monday, April 29, 2013

फोकस

' मला कॅमेरा येतो , जसं तुम्हाला गाणं लिहिता येतं . बघा ' कॅमे - याच्या स्क्रीनवर माझा नुकताच क्लिक केलेला फोटो दाखवत तो म्हणाला . फोटो छान आला होता . पस्तिशी ओलांडलेला ' तो ' माझ्या एका मित्राचा आत्तेभाऊ .. त्याचं बूड कुठेच स्थिरावत नाही , म्हणून मित्राने त्याला माझ्याकडे पाठवलेलं . तो मला सांगत होता , ' आजवर तेरा नोकऱ्या बदलल्या , कारण कामासाठी पोषक वातावरण मिळतच नाही . आजूबाजूला तुमच्या उत्तम कामामुळे जळफळाट करणारे सहकारी , तर कधी लायकी नसूनही केवळ वशिल्यामुळे तुमच्या पुढे जाणारे काहीजण , किंवा तुमच्याहूनही कमी आणि अर्धवट ज्ञान असूनही काही मंडळींचा सतत होणारा उदो उदो . अशा विचित्र वातावरणात कसं काम करणार ?.. माझी मुळं त्या वातावरणात रुजायला नकार देतात . म्हणून मी नवीन कुंडी शोधतो .'

' अहो , पण अशा किती कुंड्या बदलणार ..? सारख्या कुंड्या बदलण्याच्या सवयीने तुमची वाढ खुंटते , हे लक्षात येतंय का तुमच्या ?'

' त्याला इलाज नाही हो . तुमचा मागच्या रविवारचा कुठेही रुजणारा पिंपळ मी वाचला . पण तो पिंपळाचा आदर्श मला लागू नाही . माझा आदर्श मी सध्या शोधतोय . त्यासाठी मला मदत करा ..'

' हो , करू काहीतरी ' असं म्हणून मी विषयच बदलला .

त्याच्या हातातला कॅमेरा घेऊन समोरच्या टेबलावरच्या बोनसायचा एक फोटो मी क्लिक केला आणि त्याला दाखवला . ' कसा वाटतोय ?' ' ओह , व्हेरी गुड .. छान व्ह्यू आहे .. बोनसाय , त्या मागचा पडदा , मग खिडकी ..!'

' अहो व्ह्यू नाही , मी त्या बोनसायच्या पानावरची नक्षी टिपायचा प्रयत्न केलाय ..'

' ओह आय सी ! अहो , मग लेन्स चुकली तुमची .. यात ते बोनसाय किती लहान दिसतंय . त्यात त्याची ती अगणित पानं .. तुम्हाला हवं असलेलं पान शोधून त्यावरची नक्षी या फोटोत टिपणं शक्य आहे का ?.. तुम्ही आत्ता जी वापरलीत तिला Wide Angle Lens असं म्हणतात आणि तुम्हाला हवाय तो Micro Mode' असं म्हणून त्याने दुसरी लेन्स सेट केली आणि एक फोटो क्लिक केला . त्याने केलेल्या क्लिकमध्ये नेमकं एकच पान आणि त्यावरची नक्षी इतकंच दिसत होतं . बाकी सगळं आऊट ऑफ फोकस होतं . त्या फोटोकडे पाहून मी त्याला म्हणालो , ' सापडला , तुमचा आदर्श ...!' कॅमेरा बाजूला ठेवून मला म्हणाला , ' कुठाय ? कुठाय ? यू मीन धिस बोनसाय ?'

' नाही , ही लेन्स .. नाही पटत ? बघा , ही बोनसायची पानं म्हणजे ऑफिसमधले तुमच्या कामावर जळफळाट करणारे सहकारी , झाडाचं खोड म्हणजे लायकी नसतानाही तुमच्यापुढे वशिल्याने गेलेली लोकं आणि या पानावरची नक्षी म्हणजे तुम्हाला दिलेली असाइनमेंट !! तुम्ही सतत Wide Angle लेन्स लावल्यामुळे पानावरची नक्षी जशी तुम्हाला मघाशी दिसलीच नाही तसं होऊन जातं . नक्षीऐवजी बाकी सगळ्या गोष्टी तुमच्या फ्रेममध्ये येतात आणि ती फ्रेम तुम्हाला नकोशी होते . Micro Mode वापरून पहा . म्हणजे फोकस ऑन युवर असाईनमेंट ... नको असलेल्या सगळ्या गोष्टी आऊट ऑफ फोकस असू देत . पण हा Micro Mode फक्त तुमचं जे ध्येय आहे त्याकरताच वापरायचा आणि प्रॉब्लेम्सकडे बघताना मात्र Wide Angle.. म्हणजे जगभरातले सगळे प्रॉब्लेम्स दिसतील . आणि त्यासमोर आपला प्रॉब्लेम क्षुल्लक ठिपक्यासारखा वाटू लागेल . थोडक्यात योग्य लेन्स सेट होणं महत्वाचं आहे .'

माझं म्हणणं त्याला कितपत पटलं माहीत नाही . पण काल संध्याकाळी माझा फोन वाजला . पलिकडून ' तो ' बोलत होता , ' गुरूजी लेन्स सेट झाली बरं का .. आणि रिझल्ट्स पण हंड्रेड अॅण्ड वन पर्सेंट .. अप्रतिम .. इतकंच सांगायचं होतं ...'

आयुष्याला द्यावे उत्तर ...

संध्याकाळी सहजच चॅनल सर्फिंग करत होतो . डिस्कव्हरी चॅनलवर जीवघेण्या अपघातातून वाचलेल्या नंतर आलेल्या अपंगत्वावर जिद्दीने मात करून पुन्हा यशाचे शिखर गाठणाऱ्या काही मंडळींवर ती डॉक्युमेंटरी होती ... त्यात काही पाय गमावलेले , हात गमावलेले किंवा अन्य एखादा अवयव गामावलेले , तरीही कृत्रिम अवयव लावून पुन्हा तीच कला सादर करणारेही होते . मग त्यात काही नर्तक होते , चित्रकार होते , मॅरेथॉन धावणारे होते , ते सारं पाहून थक्क झालो आणि त्याचबरोबर माझ्यातला कवी गलबलला ... आणि त्या क्षणी एक कविता कागदावर उतरली . ते शब्द होते ....

असे जगावे छाताडावर आव्हानाचे लावून अत्तर
नजर रोखूनी नजरेमध्ये

आयुष्याला द्यावे उत्तर ...

त्या साऱ्या मंडळींची जिद्द , त्यांचा तो बाणा पाहून ते शब्द आले होते . ती संपूर्ण डॉक्युमेंटरी पाहून होईपर्यंत कविताही पूर्ण झाली होती .

नेमका दोन चार दिवसांनी मला ' इंद्रधनू पुरस्कार ' जाहीर झाला . ठाण्यातल्या एका मोठ्या सोहळ्यात ज्येष्ठ साहित्यिक शं . ना . नवरे यांच्या हस्ते तो पुरस्कार मला देण्यात आला . त्या पुरस्काराला उत्तर देताना मी नुकतीच लिहिलेली ती कविता सादर केली . लोकांची छान दाद मिळली . कार्यक्रम संपताच शं . ना . नवरे मंचावर आले आणि मला म्हणाले , ' एक गोष्ट मागितली तर मिळेल का ?' मी म्हटलं , ' बोला काय आज्ञा आहे ?' तर म्हणाले , ' आत्ता जी कविता ऐकवलीत , तीच हवी आहे . काय शब्द लिहीले आहेत हो ! अप्रतिम ! जीवनावर याहून उत्तम भाष्य मी याआधी कधीच ऐकलं नव्हतं .' माझ्याकरता ही मोठी दाद होती . मग लगेच एका कागदावर उतरवून ती त्यांच्या हवाली केली आणि म्हटलं , ' आज पहिल्यांदाच सादर केली ही कविता ...' ते म्हणाले , ' का ? अहो , ही कविता तुम्ही सादर करणं गरजेचं आहे . हे शब्द जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणं आवश्यक आहे . तेव्हा ही सादर करत चला यापुढे ..'

माझ्या आजवरच्या लोकप्रिय गाण्यांच्या जन्मकथा उलगडणाऱ्या माझ्या ' कसे गीत झाले ' या कार्यक्रमातही ती कविता मी आवर्जून सादर करतो आणि रसिकही या कवितेला भरभरून दाद देतात .

परवाच्या कार्यक्रमात मात्र निवेदिका गायिका योगिता चितळे हिने ठरल्याप्रमाणे त्या कवितेच्या संदर्भातला प्रश्न मला विचारला . कविता सुरू करणार तोच मी गोंधळलो . ' नजर रोखूनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर ' कसं म्हणू ? कारण कार्यक्रम अंधशाळेत होता . माझ्या प्रत्येक शब्दाला दाद देणारे ते रसिक दृष्टीहीन होते . त्यांच्या भावना दुखावल्या तर ?

मी भलतीच कविता म्हटली . योगिताचा गोंधळ उडाला होता . मी ती कविता विसरतोय , असं वाटून ती दर दोन गाण्यांनंतर त्या कवितेचा विषय काढत होती . अन मी भलतीच कविता म्हणून वेळ मारून नेत होतो . अखेर संधी पाहून मी हळूच तिच्या कानात माझा मुद्दा सांगितला . तिलाही तो पटला . हुशारीने सावरून घेत ती म्हणाली , ' आता वळूया कार्यक्रमाच्या शेवटच्या गीताकडे !' इतक्यात एक अंध विद्यार्थिनी उठली आणि तिने फर्माईश केली , ' गुरू ठाकुरांना विनंती आहे की , त्यांनी त्यांची ' नजर रोखूनी नजरेमध्ये ' ही आयुष्यावरची कविता सादर करावी . मला फक्त दोनच ओळी पाठ आहेत . खूप प्रोत्साहन देतात . मला पूर्ण कविता ऐकायची आहे .' माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले . क्षणाचाही अवलंब करता मी सुरुवात केली ...

पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना
हसू असावे ओठांवरती काळीज काढून देताना
संकटासही ठणकावूनी सांगावे ये आता बेहत्तर
नजर रोखूनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर .........!!

' माणुसकी '

' हे सगळं कशासाठी ?' समोरच्या पेपरवरच्या ' वाघ वाचवा मोहिमे ' च्या पानभर जाहिरातीकडे बोट दाखवत ते म्हणाले. गोव्याच्या विमानतळावर आम्ही दोघेही आपापल्या फ्लाइट्ची वाट पहात होतो. नुकत्याच झालेल्या ओळखीतून इतकंच समजलं होतं , नव्वदीतले ते आजोबा नागपूरच्या वृद्धाश्रमात असलेल्या आपल्या मित्राला भेटायला चालले होते.

' गरज आहे हो , वाघ दुर्मिळ होत चालले आहेत ना ?.. फार गंभीर बाब आहे ही... ' गप्पांना विषय छान आहे म्हणून मी संवाद चालू ठेवला. ' मला वाटतं त्याहून झपाट्याने दुर्मिळ होत चाललेल्या गोष्टींना प्राधान्य देणं गरजेचं आहे...पण लक्षात घेतंय कोण ?'
' यू मीन चित्ता ? व्हाइट पिकॉक... '
' माणूस... ' ते म्हणाले.
' गुड जोक... मला वाटतं तो एकच प्राणी जगात झपाट्याने वाढतोय. बाकी सारे दुर्मिळ होतील काही वर्षांनी... '
' नो.. आय एम नॉट जोकिंग... मी
' माणूस म्हणालो.. माणूस '... संख्या वाढतेय ती मानव प्राण्याची... पण ' माणूस ' मात्र दुर्मिळ होत चाललाय... पुरावा हवाय ?' हातातला पेपर माझ्यासमोर धरत म्हणाले.. ' बघा... पाच वर्षांच्या मुलीवरच्या बलात्काराची बातमी होती... बलात्कार , खून , भ्रष्टाचार , बॉम्बस्फोट.... माणूस नाही फक्त प्राणी आहे तो , मानवी रूपातला... '.
मग दुसऱ्या बातमीकडे बोट दाखवत म्हणाले , ' पहा मनुष्यरूपी यंत्र... रस्त्यावर अपघात होतो , बलात्कार होतो , तेव्हा मदतीची भीक मागणारे हात पाहूनही सरळ दुर्लक्ष करून ही यंत्र निघून जातात... जो तो फक्त स्वत:पुरता... स्वत:साठीच. आणि स्वत:भोवतीच फिरणारा... यंत्रमानव.. संवेदनाहीन.. नेमकं काय हरवलंय माहित्ये का ? ... माणूसकी '.
मानवप्राणी + माणूसकी = माणूस... पण ती माणुसकीच मिसिंग आहे.

' वाघ नाहीसे झाले कारण ते जंगलात राहतात... जंगलं संपवली आपणच. मग वाघ संपणारच. पण माणुसकी ? ती जंगलात नाही मानवी वस्त्यात होती. त्या वस्त्या वाढल्या शेकडोपटीने तरीही माणुसकी दुर्मिळ झाली. खरी गंभीर बाब ही आहे. माणुसकी म्हणजे सलोखा , खरेपणा , दुसऱ्याकरता निस्वार्थपणे काहीतरी करायची वृत्ती. विश्वची माझे घर म्हणणाऱ्या माऊलींचा परीघ मोठा होता. तो मग हळूहळू माझा देश , नंतर अनुक्रमे माझं राज्य , माझा गाव असा संकुचित होत गेला. पूर्वी किमान एका गावातला माणूस तरी दुसऱ्याला परका वाटत नव्हता आता एका कुटुंबातलेही परके वाटू लागलेत. स्वत:च्या आईवडिलांसाठी काही करणेही परके वाटणाऱ्या पिढ्या जन्माला आल्यात. अशाप्रकारे माणुसकीचा झपाट्याने आटणारा झरा हा खरा चिंतेचा विषय आहे. हे अधिक वाढलं तर स्वत:च्या स्वार्थापोटी भावनाशून्य झालेली माणसं एकमेकासमोर उभी ठाकतील. तेव्हा विनाश अटळ आहे. त्याआधी माणुसकीचं पुनरुज्जीवन गरजेचं आहे. नव्या पिढ्यांत संस्काराची लस टोचून ते शक्य आहे. कारण ते झालं तर माणूस टिकेल. माणूसपण टिकेल. अणि तो टिकलेला संवेदनशील आणि संस्कारक्षम माणूस जगाचा विनाश होणार नाही याची निश्चितच काळजी घेईल..! '
ते बोलायचे थांबले. वयामुळे की हळवं झाल्यामुळे माहीत नाही पण त्यांचा श्वास भरून आल्यासारखा वाटला.
' माफ करा फार बोललो... पण हा विचार पोचावा असं वाटलं... आमचा आवाज आमच्यापुरताच! तुम्ही कवी आहात. कवितेतून हा विचार मांडलात तर चार लोकांपर्यंत जाईल.. म्हणून सांगितलं '. इतक्यात त्यांच्या फ्लाइटची उद्घोषणा झाली. निरोप घेऊन ते गेले... मी त्यांचे विचार कवितेत मांडू लागलो.
माणसानं माणसांच्या वस्त्या रूजवताना
आटवून टाकल्या नद्या , पेटवून दिली रानं
अन मग फोफावणाऱ्या सिमेंटच्या जंगलात
बसून झोडू लागला परिसंवाद
गेल्या काही वर्षांत झपाट्याने घटत गेलेल्या
वाघांच्या संख्येवर...
पण त्याहून झपाट्यानं घटलेल्या एका गोष्टीचं
त्याला सोयरसुतकही नाहीय 

 माणुसकी ' म्हणत असत तिला
माझ्या माहितीप्रमाणे...
तिचं पुनरुज्जीवन जास्त गरजेचं आहे
कारण ती तगली तर वाघच काय
जगातला कुठलाच प्राणी दुर्मिळ होणार नाही..
अगदी ' माणूस ' देखील

गुरू ठाकूर

Tuesday, July 17, 2012

समथिंग मिसिंग...!

'धोंडू....मुम्बै इली रे..!' असं म्हणून खळ्यातून जोरात हाळी देणारे आजोबा ...अन्‌ मग त्या हाकेमागोमाग लगबगीनं हातातली बॅग घ्यायला धावणारा धोंडू गडी.... देव्हाऱ्यात सोवळ्यानं चंदन उगाळता उगाळता सोवळं-ओवळं विसरून चंदनाचं खोड तसंच हातात घेऊन उंबऱ्याशी धावणारी आज्जी....आणि तिचं, "बरं झालं, पावसाआदी घराक पोचलात !' हे वाक्‍य संपायच्या आत तडतड करत येणारी खोड्‌साळ पवसाची सर...
बालपणी गणेश चतुर्थीकरता कोकणात पोचलं, की या गोष्टी कधी चुकल्या नाहीत.

मग काकांसोबत मूर्ती पाहायच्या ओढीनं गणपतीशाळेत गेल्यावर तिथल्या पेट्रो मॅक्‍सच्या उजेडात डोळे बारीक करून गणेशमूर्तीच्या सिंहासनावरली नक्षी रंगवता रंगवता आपली एकाग्र नजर मुळीच न हलवता, "काय बॉ, मुम्बै कधी इली?' आ णि "यंदा तिसरीत ना रे? की चौथीत?' हा प्रश्‍न अचूक विचारणारा तातू सुतार...

हरताळकेच्या उपासाकरता बागेतल्या माडावरली शहाळी उतरवण्याकरता बोलावलेला धाकू गाबीत...खरं तर हा मासेमारी करणारा; पण माडावर वानराच्या गतीनं चढताना आणि काही वेळा एका माडावरून लगतच्या दुसऱ्या माडावर झेपावताना मी त्याला इतक्‍या वेळा पाहिला होता, की नंतर स्पायडरमॅन वगैरे मं डळींचं कुतूहलच वाटेनासं झालं होतं! त्यात आमचा धोंडू गडी एकदा म् हणालादेखील होता, "धाकलो तिकडं अमेरिकेत जन्मलो अस्तो तर स्पयडरम् यानच्या माथ्यावर झालो आस्तो.'

त्या दिवसापुरतीच भेट असूनही धाकू माझ्या वर्षभर लक्षात राही ते आणखी एका कारणाने. प्रत्येक माडावरून उतरल्यावर कमरेच्या लटकत्या कोयत्यानं त्या शहा ळ्याचा शिरच्छेद करून माझ्यासमोर धरत तो म्हणे, "ह्या बग, मघाच्या पेक्षा जा स्त मधुर आसा...!' सायीसारखं मुलायम खोबरं मिळावं म्हणून दहा माडांवरून चढ-उतार करणाऱ्या त्या काळ्याकभिन्न देहात कोवळ्या खोबऱ्याच्या सायीसारखं हळवं मन दडलंय हे कळण्याइतपत समज मला त्या वयात नव्हती; पण तरीही ती जाणीव मनाच्या कोपऱ्यात रुजली असावी. म्हणून आज चौपाटीवर रोख रक्‍क्‍म म ोजून घेतलेल्या शहाळ्यातल्या पाण्यातही मला काहीतरी मिसिंग असल्यासारखं वाटतं...

तिथून घराकडं परतलं की दारात अण्णा भटजींची हर्क्‍युलिसची दोन आरसेवाली सायकल दिसे. स्टॅंडवर लावलेल्या त्या सायकलीचं मागचं चाक पॅडल मारून फि रवताना कानावर अण्णा भटजींचा आवाज पडे ,"तांबडं फुटताना पैली पूजा तु मच्याकडं म्हणतोय; पण रात्री पावसान गुण उधळले नाई आणि व्हाळाला ( ओढ्याला) पाणी आलं नाई तर पुढची गजाल...!' 

यावर आजोबांचं, "अरे अण्णा, पाणी आलं तर या धोंडूला धाडतो. तो उचलून आणेल तुला डोक्‍यावरून; पण सातच्या ठोक्‍याला पोच..!' हे भरतवाक्‍य येत असे. 
मग माटवीकरता रानफुलं अन्‌ फळं तोडून आणणारा फटू धनगर.., गौराईकरता अबोलीच्या, सुरंगीच्या फुलांचे वळेसर (गजरे) घेऊन येणारी ताई सावतीण..., ऋषिपंचमीला त्या भाजीकरता रानातून कंदमुळं घेऊन येणारा जानू गुरव... अन्‌ यातल्या प्रत्येकाची आपुलकीच्या भावनेनं विचारपूस करून त्यांना जेवू-खाऊ घालणारी माझी आजी.....

दर वेळी कोकणात गणपतीला निघालो, की ही सारी मंडळी माझ्या डोळ्यांसमोर उभी राहतात, अगदी गेल्या वर्षीचीच गोष्ट असल्याप्रमाणं! खरं तर काळाच्या प्र वाहात यातला एकेक जण वाहून गेला; पण मनाच्या कप्प्यातल्या त्यांच्या जागा भक्‍क्‍म करून गेला!

प्रगतीचा वेग वाढला आणि आठवणींत जमा होणाऱ्या वस्तूंची यादीही वाढत चालली. किमान आहे ते तरी पुढल्या पिढ्यांपर्यंत पोचवावं, या हेतूनं यंदा तळवशे उराशीर घेऊनच आलो अन्‌ या हरवलेल्या गोष्टींची यादी प्रकर्षानं जाणवू लागली. काळाची महती सांगणारे काही दुवेच नाहीसे झाले होते. आधीच्या पिढ्या ंच्या भाबड्या भावूकपणाची जागा आता नवीन पिढ्यांच्या व्यवहारी तरबेजपणानं घेतली होती.

मी मुकाटपणे सारं टिपत होतो. वाटत होतं, आताच्या उत्सवात तेव्हाच्यातलं काहीतरी मिसिंग आहे. आता कोकणात काय अन्‌ मुंबईत काय, गणपती सारखाच. 
विसर्जनाच्या दिवशी मी पुन्हा एकदा भूतकाळात हरवलो. एरवी, तोंड भरून बोलणारी आज्जी त्या दिवशी गप्प गप्प असायची. एरवी प्रत्येक बाबतीत काटेकोर असणारे आजोबाही काहीतरी वेंधळेपणा करायचे. त्यांचा नेहमीचा सूरही हरवल् यासारखा वाटायचा. जेवणावळी, पंक्ती सारं साग्रसंगीत व्हायचं तसंच झालं; पण साऱ्यातूनच कसली तरी रुखरुख जाणवत होती. कुणीतरी आणलेला फटाका लाव ण्याकरता अगरबत्ती हवी म्हणून चोरपावलांनी देवघरात शिरलो. तिथल्या समईच्या प्रकाशात कोपऱ्यात उभी असलेली आजी दिसली. डबडबल्या डोळ्यांनी मूर्तीकडं एकटक पाहत काहीतरी बोलणारी... "आज्जी, तू रडत्येस?' बालसुलभ कुतूहलानं विचारलेल्या प्रश्‍नावर, "नाही रे! धूर गेला उदबत्तीचा डोळ्यात' असं म्हणून बाहेर जाणारी तिची पाठमोरी आकृती पुन्हा डोळ्यांसमोर तरळली.

आताच्या उत्सवात तेव्हाच्यातलं काहीतरी मिसिंग आहे. ते नेमकं काय, याचा शोध लागला होता. विसर्जनाकरता मूर्ती हलवली. अंगणात बाप्पाच्या हातावर " पुढच्या वर्षी लवकर या...!' म्हणत दही घालायला काकू सरसावली. नीट क्‍लोज मिळावा म्हणून मी हातावर चार्ज केला. कॅमेऱ्यात थरथर जाणवत होती. ट्रायपॉड असताना? मी नीट पाहिलं. थरथर काकूच्या हाताला होती. झूम आऊट होत तिच् या चेहऱ्यावर गेलो अन्‌ आज्जी आठवली. तसेच डबडबलेले डोळे...तसेच थरथरते ओठ... हातातलं भांडं सुनेच्या हातात सोपवत चपळाईनं डोळे पुसत ती म्हणाली, "किती धूर करता रे उदबत्तीचा...!'

विसर्जनाकरता तळ्याच्या काठावर पोचलो अन्‌ मोबाईल खणाणला. पलीकडून मु ंबईतला मित्र बोलत होता विसर्जनाच्या मिरवणुकीतून...मागं कानठळ्या बसवणारा डीजे सुरू होता. "अबे है किधर?' आता तुझ्याच गाण्यावर नाचतायत सगळे आ णि तुला जाम मिस करतायत.. गणपती सगळीकडं सारखाच; पण इथं मुंबईत से लिब्रेशनची मजा सोडून कोकणात जाताना आम्हाला सांगतोस, की मुंबईत "सम थिंग मिसिंग' वाटतं. असं नेमकं काय मिसिंग वाटतं रे तुला, ते तरी सांग!!' 

त्याच्या प्रश्‍नाचं उत्तर मी देऊच शकलो नाही. कारण पाण्यात जाणारी मूर्ती पाहताना कॅमेऱ्याची थरथर वाढली अन्‌ उदबत्तीचा तो धूर, जो वर्षानुवर्षं आज्जीच्या अन्‌ काकूच्या डोळ्यांना झोंबला होता, तो माझ्याही डोळ्यात शिरला...! 

Tuesday, July 3, 2012

झरे मेघ आभाळी तेव्हा

  गेल्या पावसातली गोष्ट ! आदल्या रात्री पावसानं मुंबईत थैमान घातलं होतं. साहजिकच ब-याच ठिकाणी पाणी साचल्याच्या ब्रेकींग न्युज टिव्हीवर थैमान घालत होत्या. पण गाण्याचं रेकॉर्डींग असल्याने मला तिथे जाणं भागच होतं. म्हणून निघालो. मंद गतीने वाहणा-या पश्चिम एक्सप्रेस हायवेवरुन सरकताना एका गोष्टीने माझं लक्ष वेधून घेतलं. हायवेशेजारच्या पत्र्याच्या शेडमध्ये पाणी साचल्यामुळे, एका गणपतीच्या कारखानदाराने तिथल्या तब्बल दहा गणेशमूर्ती फूटपाथवर ओळीनं मांडल्या होत्या. अन प्रत्येकावर एक, अशा दहा छत्र्या ही बांधल्या होत्या. पांढ-या शुभ्र प्लॅस्टरमधली ती मूर्ती आणि वर काळी छत्री. त्यामागे दूर जाणारा काळाकुट्ट हायवे. मी फ्रेमचा विचार करु लागलो. पावसाळा सुरु झाला की लोक शक्यतो छत्री सोबत राहील याची काळजी घेतात तसा मी कॅमेरा सोबत राहील याची काळजी घेतो. त्या क्षणीही तो सोबत होताच, पण वेळ नव्हता. त्यामुळे परत येताना तिथे ठरवून उतरलो. आता हायवे मोकळा झाला होता. पावसाची बारीक रिपरिप सुरु होती. तिथे पोचल्यावर एक गोष्ट लक्षात आली, ती म्हणजे ते सगळे गणपती हव्या असलेल्या अँगलने टिपायचे तर मला गुडघ्यावर अथवा जमिनीवर फतकल मारुन  बसणं गरजेचं होतं. त्याकरिता मी पाऊस थांबेपर्यंत वाट पहायचं ठरवलं. मग तिथल्याच झाडाखाली उभा राहून लेन्समधून आणखी काही गवसतं का? ते न्याहाळू लागलो.

दूर पलिकडे हायवेच्या कडेला एक काळी होंडासिटी उभी होती. तिचा बॅकलाईट चालू होता. पावसामुळे बंद पडली असावी का? कुणीतरी भरपावसात आपल्या कर्माला दोष देत गेला असावा बिचारा ! स्वानुभव आठवुन मला त्या न पाहिलेल्या माणसाची दया आली.अलीकडे असलेल्या बसस्टॉपवर २ मुलं, ३-४ माणसं थांबली होती. त्यातला एकजण चटकन डोळ्यात भरला. याला दोन कारणं होती. एक म्हणजे तिथे असलेल्या सर्वसामान्य माणसांच्या तुलनेत तो वेगळा वाटत होता. अतिशय रुबाबदार असा !  बसने प्रवास करणा-यांपैकी तर अजिबातच वाटत नव्हता. दुसरं म्हणजे त्याच्या हालचाली अत्यंत सावध आणि वेगळया वाटत होत्या. जणू काही आजुबाजुच्या माणसांचा त्याला अडसर होत होता. तेवढयात बस आली. ती माणसं गेली. तो मात्र तिथेच थांबला. त्याच्या चेह-यावर सुटकेचा निश्वास दिसला. आता त्याच्या हालचाली चपळ झाल्या. त्याने घाईघाईने बॅग उघडली. आतून काही काढणार तोच दुसरी एक बस थांबली. एक बाई उतरली. याने चटकन बॅग बंद केली. आणि साळसूद चेह-याने त्या बाईच्या जाण्याची वाट पाहू लागला. माझ्यातला लेखक जागा झाला. कोण असेल तो? अतिरेकी? त्या बॅगेत बॉम्ब तर नसेल? ती बॅगेतली वस्तु तिथे ठेवून निघून जायचा प्लॅन तर नसेल त्याचा? मी सावध होऊन लेन्स बदलली. ८०-४००ची लेन्स लावून झूम करत त्याच्या थोडा जवळ गेलो. खट खट दोन क्लोज टिपून घेतले, वेळ पडल्यास पोलीसांना देण्याकरता. एव्हाना ती बाई दूर गेली होती. त्याने निर्धास्तपणे पुन्हा बॅग उघडली. आतून काहीतरी वस्तु काढली. दूरवर कुणी नाही याची खात्री करुन घेत थोडा पुढे गेला. कडेला पावसाचं पाणी साचून लहानसं तळं साचलं होतं, तिथे वाकला. मी चपळाईनं ती वस्तु पाहण्याकरता झूम केलं. अन त्याच्या हातातली वस्तु पाहून थक्कच झालो. ती एक कागदाची होडी होती. मी पुन्हा क्लिक केलं. अरेच्चा!! हे म्हणजे माझ्या कवीकल्पनेतलं वास्तवात उतरत होतं. .माझ्यातल्या  कवीने हळवं होत माझ्यातल्या लेखकाला मुर्खात काढलं. मी तसाच लांब ढांगा टाकत  निघालो अन त्याला गाठलं.
’क्या बात है!!! तुमच्यातलं मूल तुम्ही अजुन जपलंय.फार कमीजणांना जमतं हे  म्हणून अभिनंदन !”
तो ओशाळून हसत उठला. आणि म्हणाला, “माझं बालपण पलिकडच्या वस्तीत गेलं. तेव्हा शाळेतून जाताना आम्ही भावंड इथल्या पाण्यात होड्या सोडायचो. बरीच वर्ष झाली. आम्ही इथून गेलो. हायवे रुंद झाला. त्या बैठ्या चाळी गेल्या. ती डबकी नाहीशी झाली. आता मी एका मल्टिनॅशनल कंपनीचा सीईओ आहे. रहेजा टाऊनशीपमध्ये रहातो. पण कालच्या बेफाम पावसानं ब-याच वर्षांनी साचलेलं हे तळं सकाळी जाताना पाहिलं. अनं जुने दिवस डोक्यात पिंगा घालू लागले. सकाळपासून कामातही लक्ष लागेना. त्या दिवसांच्या तंद्रीत इतका हरवलो, की समोर आलेल्या डेली रिपोर्ट्च्या कागदाची नकळत होडी बनवली. भानावर आलो त्या क्षणी वाटलं फार झालं ! हीच ती वेळ ! बस्स ! तब्येतीचं कारण करुन ऑफिसमधून निघालो.
मी पाहिलं, पाण्यात ३ होड्या तरंगत होत्या, एक माझी, दुसरी विकासची, माझा भाऊ! तो आता न्युझिलंडला असतो, अन तिसरी नीताची, आमची लहान बहीण! जी अबुधाबीला सेटल झाली आहे लग्नानंतर.” स्वत:शीच बोलल्यासारखा तो बोलत होता. ’रात्री चॅट करताना सांगेन त्यांना ही गंमत ! पण आता खरंच खूप रिलॅक्स वाटतंय. चला निघतो. सहाची मीटींग गाठायला हवी.’  स्वत:चं कार्ड देत माझा निरोप घेताघेता  तो बालपणातून पुन्हा सीइओच्या भूमिकेत शिरला. अन रस्ता पार करुन पलिकड्च्या त्या काळ्या होंडा सीटीत बसून भुर्र्कन नाहिसा देखील झाला. काही दिवसांपुर्वी माझ्या मित्राने  माझी

झरे मेघ आभाळी तेव्हा
भान हरपूनी चिंब भिजावे
थेंबांचे इवलाले मोती
तळहातावर झेलून घ्यावे

झरे मेघ आभाळी तेव्हा
रंगांच्या रानात शिरावे
ठाईठाईचे हिरवे यौवन
गात्रांमधे भरुन घ्यावे
ही कविता ऐकु विचारलं होतं, ’हे सारं शहरातल्या माणसाला जमत नाही त्याने काय करावं? त्याचं उत्तर याच्या त्या कृतीने दिलं होतं..
झरे मेघ आभाळी तेव्हा
क्षणभर अपुले वय विसरावे
नाव कागदी घेऊन हाती
खुशाल डबक्याकाठी रमावे !!!!

Sunday, December 11, 2011

केशीवाऽऽऽऽ मादीवाऽऽ.....


"....म्हणून म्हणतो, आजच्या जगात मार्केटिंग शिवाय सारं फोल आहे बाबा.." -याच वर्षांनी अचानक भेटलेला माझा एक स्नेही मला पटवून देत होता. मार्केटिंग स्किल या विषयावर तो ठिकठिकाणी जाऊन व्याख्यानं देण्याचंच काम करतो आणि त्यातूनच कसा गलेलठ्ठ मोबदला मिळवतो याचीही साग्रसंगीत माहिती तो देत होता इतक्यात, "केशीवा मादीवा तुज्या नावाची रे गोडीवा " कानाचे पडदे फाटतील इतक्या मोठ्ठ्या आवाजात हे गाणं किंचाळत एक पंधरा सोळा वर्षाचा मुलगा डब्यात शिरला. हातानं गळ्यातली हार्मोनियम वाजवत होता.
काय त्रास आहे साला...!” माझ्या शेजारी बसलेला कपाळाला आठ्या घालत म्हणाला. रात्रीचे साडेअकरा वाजत होते. डब्यात तशी गर्दी नव्हती.साहजिकच त्याला फारसं काही मिळण्याची ही शक्यता नव्हती. तरीही वा-यावर पेंगणा-या एका पारशाने त्रासिक नजरेनं पहात झोपमोड करणारी ती ब्याद टळावी या हेतूने पाच रुपयाचं नाणं त्याच्या हातावर टेकवलं.
आजच्या जगात मार्केटिंग कसं महत्वाचं शस्त्र आहे हे जो मला पटवून देत होता. त्याने लगेच मुद्दा पकडला..”silly boys! मला सांगा ह्या पोरांनी हेच गाणं जर सुरात म्ह्टलं, तर त्यांना जास्त भीक नाही का मिळणार?”
कसं शक्य आहे? वर्षानुवर्षं गाणं शिकून reality show पर्यत पोहोचणा-या मुलांना जिथे सूर सापडत नाही. तिथे या पोरांना कुठला सापडायला?
पण मग शब्द तरी? जे गाणं आपण दिवसातून २०० वेळा गाणार त्याचे शब्द नीट पाठ नकोत? कसे पैसे मिळणार?...customer’s psychology ओळखायला हवी..साधं मार्केटींग टेक्निक आहे.. म्हणजे इथेही मार्केट स्टडी आलाच! थकून भागून घरी जाणा-या प्रवाशांना छान सुरेल असं गाणं ऐकायला मिळालं तर ते तशी बिदागीही देतील. कौतुकही करतील. हे त्याला कळायला हवं.मी नेहमी म्हणतो "तुझे आहे तुजपाशी परी तू प्रोसिजर चुकलासी" आणि याचंच नाही रे -याच जणांचा हाच घोळ असतो तो निस्तरून त्यांचं घोडं मार्गी लावण्याच काम आम्ही करतो.” मी म्हटलं,"मग याचंही घोडं मार्गी लाव की, तो तुला बिदागी नाही देऊ शकणार पण तेवढंच पुण्यकर्म होईल हातून!”
त्यालाही ते पटलं असावं त्याने कोप-यात चिल्लर मोजत बसलेल्या त्या पोराला बोलावलं. म्हणालाआवाज छान आहे तुझा. पण जरा शब्दांकडे लक्ष दे, सूर सांभाळ किती गोड होईल गाणं.तसं म्हटलंस तर मी दहा रुपये दिले असते..”
नक्की ?”
"प्रॉमिस ! " मार्केटींग महाराज म्हणाले.
दुस-या क्षणी त्या पोरानं डोळे मिटले सराईतपणे गळयातल्या हार्मोनिअमवर बोटं फिरवली अन सूर लावला.."रस्मे उल्फत को निभाये तो निभाये कैसे...”
आम्ही दोघं थक्क झालो. गाण्यातले शब्द, त्यातली एकेक जागा तो अचूक घेत होता. हा काय चमत्कार ? एव्हाना त्या पारशानं ही डोळे उघडले होते,
क्या बात है!” गाणं संपल्यावर आम्ही दोघांनी दहाच्या नोटा त्याच्या खिशात सरकवल्या. त्या पारशानंही त्याचं अनुकरण केलं.
अरे सोन्या, हे इतकं चांगलं गाता येतं ना? मग बेसुर का गातोस?”
धंद्यासाठी गावं लागतं साहेब”!
त्याच्या या वाक्यावर आम्ही दोघे उडालोच,"धंद्यासाठी म्हणजे ?"
माझा बाप छान पेटी वाजवायचा सुरेल, आई गायची, दोघं भीक मागायची पण तुम्हाला सांगतो लोक नुसतं ऐकत बसायचे, त्यानी अजून गावं म्हणून फर्माईश करायचे, अन आपापलं स्टेशन आलं की फुटकी कवडीही देता उतरुन जा्यचे. मी आईच्या कडेवर असल्यापासुन हे सगळं पाहिलंय. म्हणून मी हा असा फंडा शोधला.”
मी मार्केटिंग महाराजाना म्हटलंआलं का लक्षात? याच्या या बेसूर कर्कश्श गाण्यातच त्यांचं बिझनेस स्किल लपलंय.!”
काहीतरीच काय?” मला खुळ्यात काढ्त तो म्हणाला, “बेसूर गाण्यात कसलं आलंय बिझनेस स्किल?”
अरे बाबा, त्याना तू म्हणतोस तशी customer’s psychology समजलीय..कारण त्यांने ही मार्केट स्टडी केलाय.’
तो कसा?’
बघ,आता ही पोरं सुरात गायली तर लोक ऐकत बसणार, त्यानी अजून गावं म्हणून फर्माईश करणार त्यात याचा वेळ वाया जाणार शिवाय पैसे नाहीच, कारण पैसे मागायला आले की जो तो झोपेचं सोंग घेणार..खरंय की नाही?’
तो मुलगा मनापासून हसला आणि, "अगदी खरंय साहेब."म्हणून उतरुन पुढच्या डब्यात पळाला देखील.
पण त्याचा या कर्कश्श गाण्याशी काय संबंध?” गोंधळलेल्या मित्राने विषय अजून लावूनच धरला होता.
अरे,त्या तुलनेत कर्कश्श गाण्याचे अनेक फायदे आहेत,मुळात हा बेसूर गाऊ लागला की झोपमोड होते. मोबाईलवर बोलणा-यांना व्यत्यय होतो. कानसेनांना तर एका सुरेल गाण्याचा असा अघोरी छ्ळ ही सोसत नाही. त्यामुळे लवकरात लवकर ही ब्याद टळावी म्हणून लोक पटापट पैसे देऊन त्याला पुढे घालवण्याचा सोप्पा मार्ग निवडतात. त्यामुळे कमीतकमी वेळात अपेक्षित धंदा करुन हा पुढच्या डब्यात जायला मोकळा.”
माझ्या या विधानावर तो थक्क झाला. “क्या बात है! कमालीचं लॉजिक आहे त्याचं. पण हे तुमच्या कसं ध्यानात आलं? तुम्ही पण एमबीए वगैरे?”
मी मानेनेच नकार दिला.
मग नक्की तुम्ही खूप वाचत असणार..राईट?”
हो”...मी म्हटलं.
काय वाचता? I mean especially काय वाचायला आवड्तं?”
परिस्थिती..आणि त्यात भरडली जाणारी माणसं...ती बरंच काही शिकवून जातात. जसं आता हा शिकवुन गेला !” तो पुढे काही विचारण्याआधी मी दाराकडे सरकलो नकळंत मला नवं ज्ञान देणा्रा तो "गुरु" प्लॅट्फॉर्मवर दिसेल या आशेने!!