Showing posts with label कविता. Show all posts
Showing posts with label कविता. Show all posts

Monday, November 20, 2017

अनुवाद

रात्रभर खिडकीबाहेर दिसणारा 
चंद्राचा चतकोर चघळीत
 तो सुन्न बसून होता 
त्या सैरभैर मन:स्थितीत 
त्याने आठवणींचा  
आसवांत केलेला अनुवाद
 कागदभर विखुरला होता...
जो पहाट किरणानी स्वाहा केला.
एक काव्य जगाला अज्ञातच राहून गेलं.
                   गुरु ठाकूर

Thursday, June 1, 2017

अगतिक

दाटल्या आभाळाची अगतिकता
डोळ्यात थोपवून धरत
भेगाळलेल्या भुईच्या कुशीत
आशा पेरणारा तो
लेकरांच्या तोंडात घास पडावा
म्हणून आभाळाची करुणा भाकणारा तो
भाबडा निरागस पिचून गेलेला
तरीही आशावादी
मग अाम्ही म्हनायचो
नको भिऊ भावा हौत आमी तुझ्या पाठीशी
तू तिथं खचलेला आमी हितं पिचलेले
आमचं बी काय फार जोमात
नाही चाल्लंय पन
तुझे हाल पाहून काळीज हाल्लंय
नाहि पहावत तुझा त्रास
देऊ आमच्यातला अर्धा घास
पन काल अचानक पाहिला
त्यालाच टिव्हीवर
शेकडो लिटर दुधाची नासाडी
करताना हजारो टन भाजीपाला
पायदळी तुडवताना
अरवाच्च ऊद्दाम भाषेत बोलताना
मिळेल त्याची वाहनं पेटवून देताना
तेवा विश्वास बसेना डोळ्यावर
हा तोच आहे
वाटलं हा आता झाला की
समर्थ याला नाही आमची गरज
आमीच राहिलो पिचल्या कण्याने
जागोजाग ट़याक्स हाप्ते नी टोल भरत
मन मुकाट पहात राहिलं
आतल्या आत खात राहिलं
मग अचानक ध्यानात आलं
ह्ये तर हितलंच वारं तिथं गेलंय
कळपात शिरलेल्या लांडग्यानी
कोकरांच्या नावानं राजकारन क्येलंय !

Wednesday, May 31, 2017

आस

आभाळावर 
चंद्र टांगूनी
फरार होतो
 दिवस बेरका
रात्र आंधळी 
हसते गाली
टाकुनिया 
निश्वास पोरका
नैराश्याची 
निघते खपली 
आठवणींना 
उकळी फुटते
निर्वासित 
स्वप्नांची वस्ती
आस ऊद्याची 
लावून निजते
- गुरु ठाकुर

पाणीपुरी


पाणीपुरी सारखी वागतात
स्वप्नं देखील कधीकधी
काही ढासळतात
ओठांशी नेता नेता
अनपेक्षित पणे हातातच
अन मग सलत रहातात
परीटघडीच्या शर्टावरल्या
डागांसारखी आयुष्यभर
तर काही
झणझणीत ठसका देतात
प्राण कंठाशी येऊन
डोळे डबडबून येईस्तो
ब्रह्मांड दाखवतात
त्या तेवढ्या एका
क्षणातच
- गुरु ठाकूर 

Monday, May 29, 2017

घुमट


कधी रखरखत्या ऊन्हात 
तर कधी मुसळधार पावसात
आपापल्या कारणांसाठी
त्याच्या वळचणीला 
रेंगाळलेली पाखरं
दिवस मावळताच 
परत जातात आपापल्या
ऊबदार घरट्यांत तेव्हा 
त्या रिकाम्या वळचणींतला
एकांत अंगभर माखून
एखाद्या योग्यासम बसलेल्या 
त्या मंदिराच्या घुमटातून
मालकंस पाझरल्याचा भास 
होत रहातो अनेकदा 
माझ्या जडावणा-या पापण्यांना
आमच्यात काहितरी विलक्षण 
सख्य असावं नक्की….
- गुरु ठाकूर

Saturday, March 18, 2017

काटा

या देहाचा कोष भेदूनी
वाटे डोही चिरंतनाच्या 
झोकून द्यावे..
पण आत्म्याच्या खोल मुळाशी
रुतल्या पारंब्या मोहाच्या
काय करावे
गूढ कोठली काजळमाया
सांगे आता  उचला गाशा
शिणल्या थकल्या गात्रांमधूनी
वैराग्याचा वाजे ताशा
छिन्न पाउली परि ठुसठुसतो
 स्वार्थाचा हा छचोर काटा
कसे निघावे?

 - गुरु 

Saturday, March 4, 2017

निवांत

पडून रहावं एखाद्या 
निर्मनुष्य किना-यावर
चांदण्या गोंदलेलं 
आभाळ पांघरुन 
सागराची गाज रिचवत
नाळ जोडावी अथांगाशी
वाळूशी सलगी करताकरता 
भिनू द्यावा तिच्यातला 
निस्वार्थ अलिप्तपणा 
आपल्याही वृत्तीत
बांधून टाकावं मनाचं टोक 
भणाणत्या वा-याच्या
पदराला अन....
पडून रहावं एखाद्या 
निर्मनुष्य किना-यावर
चांदण्या गोंदलेलं 
आभाळ पांघरुन


  • गुरु ठाकूर

गारुड

संन्यस्त विरागी होतो
रिचवून रिपूंचे रंग
जरी वसंत भवताली मी
शिशिरात आपुल्या दंग
मग कळले नाही कुठुनी
हे सूर वेणुचे आले
निजलेल्या गात्रांमधुनी
जणु गोकुळ जागे झाले
ओंजळीत अर्ध्याच्याही
मज दिसते यमुना आणि
स्पंदनात गोपगड्यांच्या
रासाचा ताल निनादे
हे तुझेच गारुड राधे
हे तुझेच गारुड राधे....
                 - गुरु ठाकूर


वाचन..

गंभीर,विनोदी,रंगीबेरंगी 
फसव्या आकर्षक  मुखपृष्ठांची 
गुंतागुंतीचं कथानक असलेली
अगणित माणसं
वाचता येतात भोवतालच्या गर्दीत
काही डोक्यावरुन जातात
तर काही डोक्यात
पण म्हणून
वाचन वाचन थांबवू नये
                -     गुरु ठाकूर

ती…



खोचते वीज पंखात तरी पदरात
तिच्या सांडून  चालली  माया 
ओठात हसू गोंदून  उभी निक्षून 
जणू आभाळ उभं पेलाया 
ती अनुरागाची अोल हरवुनी तोल
स्वये शृंगार जिथे मोहरतो
ती समर्पणाची शर्थ प्रीतीचा अर्थ
तीच्या त्या गात्रांतून पाझरतो
ती सती रती रेवती कि तारामती  
तिचा गं  रोज निराळा गंध 
ती नदी मत्त मोकळी जी आतुर जळी 
तोडण्या सज्ज रुढींचे बांध 
 -गुरु ठाकुर


फुंकर

सुर्यास्तानंतर
 युद्ध छावणीत अंग टेकताच
विझू घातलेल्या आकाशात
दिसतात अपार मायेने
अोथंबलेले तुझे डोळे
तुझ्या पापण काठी 
रेंगाळलेला भाबडा मेघ 
सांडण्या आधीच 
भिजवून जातो मला
अन मग त्यात वाहुन जाते 
मी अंगभर फासलेली
तत्ववेत्त्याची राख,
हटनिग्रहाचा वज्रलेप.
तुझ्या अथांग डोळ्यात 
दाटलेल्या समर्पणात सापडते
मला माझीच हरवलेली
नितळ निळाई अन 
विरत जातो  कुरुक्षेत्रावरील 
शंखनादातून उफाळलेला
असह्य दाह
खड्गांचा खणखणाट
विजयी चित्कार
अन घायाळंचं रुदन ही
मला इतकंच सांग राधे
हे दिव्य सूर ज्या वेणूतून
पाझरतायत 
तिच्यावर फुंकर
घालणारे ते अोठ 
नेमके तुझे आहेत
की माझे????

  • गुरु ठाकूर

कवडसा !




कवडश्यांसारखी शिरतात 
काही माणसं 
मनाच्या गवाक्षांतून
अचानक थेट काळजात
अन मग अचानकच 
निघूनही जातात
कवडश्यांसारखीच
कसलाही मागमूस ठेवता
आपण ऊन्हाचा कल 
 अोळखून असावं ..

- गुरु ठाकूर