" ऊठ, रखरखाटाने पोऴेलया पांथस्थाला सावल्यांची स्वप्न पडणे स्वाभाविक आहे. सावली देणे हा झाडांचा धर्म तो ते इमाने इतबारे पाळते असते पण म्हणून सावली करता थांबलेल्या पांथस्थाने झाडाशी घरोबा करू नये . जे सावलीत रमतात त्यांचा प्रवास खुंटतो, शिवाय मुक्काम म्हटला की विस्ताव आला अन् विस्तव म्हटलं की झळ आली. झाडाला झळ सोसत नाही कारण त्यांच्या मनात पिढीजात वणव्याचा धसका दबा धरुन असतो त्यामुळे झाडाने तसं नाकरण्याआधीच पांथस्थाने पथिक व्हावं .
तसं पाहायला गेलं तर पंथांशी अस्तापर्यंत जोडला राहाणं हा पांथस्थाचा वसा… त्याला मुक्कामाची मुभा नसते पदरात पडलेल्या सावली करता झाडांचे आभार मानून त्याने पुढल्या प्रवासा करता निघावं यातच शहाणपण असतं …. "
त्याने डोळे उघडले तेव्हा त्याच्या लक्षात आलं पारावरल्या झुळुकेनं त्याचा डोळा लागला होता…त्याच्या उशाशी शेंदरी दगडाखेरीज कुणीच नव्हतं पण मग, ते कोण बोललं??
भानावर आला तरी ते शब्द त्याच्या कानात रुंजी घालत होते “पंथांशी अस्तापर्यंत जोडला राहाणं हा पांथस्थाचा वसा… त्याला मुक्कामाची मुभा नसते पदरात पडलेल्या सावली करता झाडांचे आभार मानून त्याने पुढल्या प्रवासा करता निघावं यातच शहाणपण असतं “ का कोण जाणे त्याला त्या पडक्या मंदिरातला संन्यासी आठवला .तो असंच काहीबाही बोलायचा .त्याने कृतज्ञ नजरेने झाडाकडे पाहिले झाड मात्र घरटे टाकून गेलेल्या पाखरांच्या प्रतीक्षेत हरवल्या सारखं उभं होतं. मुक्कामाचा मोह अनावर होण्या आधीच प्रस्थान करायला हवे असा विचार करून तो उठला. झाडाकडे पाठ करुन चालू लागल्यावर देखील एकदा वळून पाहण्याचा मोह तो टाळू शकला नाही .
त्याने एकदा झाडांकडे वळून पाहिले वाऱ्याने हलणारी एक भली मोठी फांदी जणू आपल्या करता शुभास्ते पंथान संतु म्हणत निरोपाचा हात हलवत आहे असा भास त्याला झाला .
-गुरु ठाकूर
पांथस्थ ची किती सुरेख व्याख्या केली आहेस गुरु तू!
ReplyDeleteपांथस्थ ची किती सुरेख व्याख्या केली आहेस गुरु तू!
ReplyDelete