Thursday, June 1, 2017

अगतिक

दाटल्या आभाळाची अगतिकता
डोळ्यात थोपवून धरत
भेगाळलेल्या भुईच्या कुशीत
आशा पेरणारा तो
लेकरांच्या तोंडात घास पडावा
म्हणून आभाळाची करुणा भाकणारा तो
भाबडा निरागस पिचून गेलेला
तरीही आशावादी
मग अाम्ही म्हनायचो
नको भिऊ भावा हौत आमी तुझ्या पाठीशी
तू तिथं खचलेला आमी हितं पिचलेले
आमचं बी काय फार जोमात
नाही चाल्लंय पन
तुझे हाल पाहून काळीज हाल्लंय
नाहि पहावत तुझा त्रास
देऊ आमच्यातला अर्धा घास
पन काल अचानक पाहिला
त्यालाच टिव्हीवर
शेकडो लिटर दुधाची नासाडी
करताना हजारो टन भाजीपाला
पायदळी तुडवताना
अरवाच्च ऊद्दाम भाषेत बोलताना
मिळेल त्याची वाहनं पेटवून देताना
तेवा विश्वास बसेना डोळ्यावर
हा तोच आहे
वाटलं हा आता झाला की
समर्थ याला नाही आमची गरज
आमीच राहिलो पिचल्या कण्याने
जागोजाग ट़याक्स हाप्ते नी टोल भरत
मन मुकाट पहात राहिलं
आतल्या आत खात राहिलं
मग अचानक ध्यानात आलं
ह्ये तर हितलंच वारं तिथं गेलंय
कळपात शिरलेल्या लांडग्यानी
कोकरांच्या नावानं राजकारन क्येलंय !

Wednesday, May 31, 2017

आस

आभाळावर 
चंद्र टांगूनी
फरार होतो
 दिवस बेरका
रात्र आंधळी 
हसते गाली
टाकुनिया 
निश्वास पोरका
नैराश्याची 
निघते खपली 
आठवणींना 
उकळी फुटते
निर्वासित 
स्वप्नांची वस्ती
आस ऊद्याची 
लावून निजते
- गुरु ठाकुर

पाणीपुरी


पाणीपुरी सारखी वागतात
स्वप्नं देखील कधीकधी
काही ढासळतात
ओठांशी नेता नेता
अनपेक्षित पणे हातातच
अन मग सलत रहातात
परीटघडीच्या शर्टावरल्या
डागांसारखी आयुष्यभर
तर काही
झणझणीत ठसका देतात
प्राण कंठाशी येऊन
डोळे डबडबून येईस्तो
ब्रह्मांड दाखवतात
त्या तेवढ्या एका
क्षणातच
- गुरु ठाकूर 

Monday, May 29, 2017

घुमट


कधी रखरखत्या ऊन्हात 
तर कधी मुसळधार पावसात
आपापल्या कारणांसाठी
त्याच्या वळचणीला 
रेंगाळलेली पाखरं
दिवस मावळताच 
परत जातात आपापल्या
ऊबदार घरट्यांत तेव्हा 
त्या रिकाम्या वळचणींतला
एकांत अंगभर माखून
एखाद्या योग्यासम बसलेल्या 
त्या मंदिराच्या घुमटातून
मालकंस पाझरल्याचा भास 
होत रहातो अनेकदा 
माझ्या जडावणा-या पापण्यांना
आमच्यात काहितरी विलक्षण 
सख्य असावं नक्की….
- गुरु ठाकूर

Saturday, March 18, 2017

काटा

या देहाचा कोष भेदूनी
वाटे डोही चिरंतनाच्या 
झोकून द्यावे..
पण आत्म्याच्या खोल मुळाशी
रुतल्या पारंब्या मोहाच्या
काय करावे
गूढ कोठली काजळमाया
सांगे आता  उचला गाशा
शिणल्या थकल्या गात्रांमधूनी
वैराग्याचा वाजे ताशा
छिन्न पाउली परि ठुसठुसतो
 स्वार्थाचा हा छचोर काटा
कसे निघावे?

 - गुरु