Friday, January 5, 2018

द्विधाता

पाऊस जडवला कि वातावरणावर गुढाची वाकळ  अंथरतो
अशावेळी  हि दुपार कि सकाळ कि सांज वेळ ?
कशाचाच संदर्भ लागेनासा होतो
सारं  धूसर अस्पष्ट त्यात  संततधारेचा अव्याहत चालणारा सूर मिसळला
कि मनाला हळवं व्हायला निमित्त मिळतं
  अंतरंगाचे कोनाडे धुंडाळत ते भिरभिरत सुटतं
उसवलेल्या ढासळलेल्या भूतकाळात मिसळलेल्या
अंधुक आठवणींचे शेंडे शोधून
तिथेच रेंगाळण्याचा चाळाहि त्याला हवाहवासा वाटतो.
हुकलेल्या क्षणांच्या चुकलेल्या गाणितांचा
 ताळा मांडून पहाण्याचा अट्टाहास देखील त्याला करावासा वाटतो
 त्या शिलकीत हाती लागलेले सल मनाचा कल बदलतात
 त्या त्या प्रसंगातल्या निग्रहातली निरर्थकता जाणवत रहाते 
विरागी वृत्तीला उकळी फुटते बाहेर सृजनाला श्रावणी भर 
आणि आत वैराग्याला बहर अशी द्विधा अवस्था होऊन जाते
- गुरु ठाकूर 

No comments:

Post a Comment