Saturday, March 4, 2017

फुंकर

सुर्यास्तानंतर
 युद्ध छावणीत अंग टेकताच
विझू घातलेल्या आकाशात
दिसतात अपार मायेने
अोथंबलेले तुझे डोळे
तुझ्या पापण काठी 
रेंगाळलेला भाबडा मेघ 
सांडण्या आधीच 
भिजवून जातो मला
अन मग त्यात वाहुन जाते 
मी अंगभर फासलेली
तत्ववेत्त्याची राख,
हटनिग्रहाचा वज्रलेप.
तुझ्या अथांग डोळ्यात 
दाटलेल्या समर्पणात सापडते
मला माझीच हरवलेली
नितळ निळाई अन 
विरत जातो  कुरुक्षेत्रावरील 
शंखनादातून उफाळलेला
असह्य दाह
खड्गांचा खणखणाट
विजयी चित्कार
अन घायाळंचं रुदन ही
मला इतकंच सांग राधे
हे दिव्य सूर ज्या वेणूतून
पाझरतायत 
तिच्यावर फुंकर
घालणारे ते अोठ 
नेमके तुझे आहेत
की माझे????

  • गुरु ठाकूर

2 comments:

  1. अहाहा काय अप्रतिम लिहिलं आहेस गुरु!
    मला बासरी आणि राधा ही दोन्ही स्त्रीतत्व अद्वैत आणि अद्भुत वाटतात.
    गोकुळ सोडल्यापासून कृष्णाने पुन्हा मागे वळून पाहिलं नाही....राधा आणि बासरी दोन्ही त्याच्या प्रतीक्षेत आहेत आजवर !

    ReplyDelete