Tuesday, July 7, 2015

कृष्ण लीला...

त्या चित्रप्रदर्शनातल्या प्रत्येक फ्रेममध्ये मी हरवून जात होतो. रंग, रेखा, मांडणी, याच्याही पलीकडे जाऊन गुरफटत होतो. विषय होता “कृ्ष्ण”!!! श्रीकृष्णाची अनेक रुपं त्या चित्रकारानं चितारली होती. ज्यातून श्रीकृष्णाच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू कॅन्व्हासवर जिवंत झाल्यासारखे वाटत होते. मुळात श्रीकृष्ण ही व्यक्तिरेखा मला नेहमीच भुरळ घालणारी वाटत आली आहे. कारण जितकं जवळ जावं तितकं अधिक गहन होत जाणारं ते कॊडं ! एखाद्याला प्रश्न पडावा, की यातलं खरं काय?
त्याच्या रंगाचंही तसच आहे..निळाच का? तर तो आकाशाचा रंग..आकाश म्ह्णजे काय तर जे आहे असं वाटतं पण नाहिये..आभासी पोकळीच नुसती..गुढ निळाई केवळ.पुराणात काही ठिकाणी त्याला काळा म्हटलंय..तो तर रंगच नाही...काळा रंग म्ह्णजे खोली depth.जीचा थांग लागत नाही.आपल्या आकलनाचा प्रकाश जिथवर पोचतो त्याच्या पलिकडे सगळा अंधारच की..
प्रत्येक चित्राशी थांबून माझी खात्री होत होती की मला त्याचं सर्वात भावणारं रुप बहुतेक हेच आहे. पण पुढच्या चित्राकडे वळताच माझं मत बदलत होतं. कळेना त्याचं खरं रुप कोणतं? खोड्या करणारं खट्याळ! जे सूरदासांना भावलं? की निरागस,भावुक,नटखट! गोपींची वस्त्रे लपवणारं शृंगाररसात भिजलेलं जे राधेला भावलं? की अत्यंत कुशल राजकारणी! जे भिष्माचार्यांनी ओळखलं? की महान तत्वज्ञ! जे अर्जुनाला दिसलं? की अनन्य साधारण भक्तिरसात चिंब होऊन भवतालात भरुन राहिलेलं! ज्यात मीराबाईला विलीन व्हावंसं वाटलं?
 एकाच कसलेल्या अभिनेत्यानं वेगवेगळ्या भूमिका इतकं समरस होऊन साकाराव्या की पाहणा-याला त्या त्या वेळी तो तसा तसा वाटावा. पण त्यापलीकडे या सा-या भूमिकांच्या पलीकडचा मूळ तो कसा आहे हे गूढच रहावं तसंच काहीसं. ती सारी चित्र डोळ्यात साठवून प्रदर्शनातून बाहेर पडलो. तो नेमका कसा असावा? डोक्यात विचारांचा गुंता भिरभिरु लागला. उत्तर काही सापडेना. आणि मग हा गुंता काव्याकार घेऊ लागला. जहांगीर आर्टस गॅलरीच्या पाय-या उतरतानाच ते काव्य पूर्णत्वालाही गेलं. मग त्या पाय-यांवर बसून ते टिपून काढलं. साहजिकच जहांगीर आर्टस गॅलरीच्या पाय-यांवर जन्माला येण्या़चं भाग्य त्याला लाभलं. ही देखील कृष्णलीलाच !!!!

तू रासातील राधेच्या मनमोहन कुंजविहारी
की भासातील मिरेच्या तू नटनागर गिरीधारी ....?

तू दिव्य कधी तू भव्य कधी
तू शृंगाराचे काव्य कधी
तू पार्थसारथी रणांगणातील
सार्थ सुदर्शन धारी?
की भासातील मिरेच्या तू नटनागर गिरीधारी ....?

तु रास रसिक यमुनेकाठी
अन बंधुसखा द्रौपदी साठी
मयसभेत भरल्या गहिवरला

तो भोळा शाम मुरारी

की भासातील मिरेच्या तू नटनागर गिरीधारी ....?

6 comments:

 1. खुपच सुंदर शब्द..श्रीकृष्णचे रूप सहज आणि सोप्या शब्दातले वर्णन छानच आहे..

  ReplyDelete
 2. खुपच सुंदर शब्द..श्रीकृष्णचे रूप सहज आणि सोप्या शब्दातले वर्णन छानच आहे..

  ReplyDelete
 3. Wah...apratim...krishna che yatharth warnan!!!!

  ReplyDelete
 4. Wah...apratim...krishna che yatharth warnan!!!!

  ReplyDelete
 5. कृष्ण मुळातच अवघड ! एखाद्या कसलेल्या चित्रकाराचे चित्र - कुठूनही पाहिले तरी नजर आपल्यावरच रोखलेली दिसते... तसाय कृष्ण. त्याच्याकडे पहाताना तूमच्या मनातले भाव जसै असतील , कल्लोळ जसा असैल , तसा हा कृष्ण !

  ReplyDelete