Friday, March 3, 2017

कलावंत अन निर्मिती

निर्मितीचं  वरदान प्रत्येकालाच लाभतं असं नाही आणि लाभलेल्यांपैकी प्रत्येकाला ते मानवतं असं नाही कारण कलावंत म्हणून निर्मितीतलं ताजेपण जपणं ही सहज गोष्ट नाही.आपल्याला अनेकदा काही कसलेले कलावंत सहजपणे एखाद्या कलाकृतीला जन्म देताना दिसतात पण त्या सहजते मागे त्यांची साधना असते जसा शांतपणॆ जलाशयावर विहार करणारा राजहंस पाहताना त्याचे पृष्ठभागाखाली अतिशय वेगाने पाणी कापणारे पाय आपल्याला दिसत नाहीत त्यामुळे आपण थक्क होतो हे पृष्ठ्भावरलं सादारीकरण  तोवरच सफाईदार दिसतं जोवर पायांचं कार्य अथक सुरु आहे.कलाकृतीतला ताजेपणा अन नाविन्यही तसंच जोवर कलावंताची नाविन्याची भूक अन त्याकरता झोकून देण्याची आस धगधगत आहे तोवरच ती टीकून रहाते. पण अनेकदा अचानक्पणे मंदावते.निर्मितीच्या ध्यासाने झपाटलेला कलावंत पहाता पाहता भरकटतो अन दिशाहिन होत जातो.याला कारण यश.सिद्धी पेक्षा प्रसिद्धीचा मुकुट मोठा असला की तो घसरून डोळ्यावर येतो.अन दृष्टीभ्रम निर्माण करतो.कालच्या ्गेल्या पावसाळ्यावर यंदाचं पीक तगत नसतं याचा त्याला विसर पडतो.स्वत:ची अत्युत्तम निर्मिती क्षणात विसरु्न जो नवनिर्मितीच्या ध्यासात हरवू शकतो तो खरा कलावंत. आधीच्या ्यशस्वी भूमिकेची झूल उतरवून विवस्त्रपणे नव्या भूमीकेत शिरण्याचं शास्त्र ज्याला उमगलं तो कलावंत. याकरता विवेकासारखा सारथी सोबत असवा लागतो.यशाच्या रथावर स्वार होताना विवेकासारखा सारथी नसेल तर रथाचे वारू चौफेर उध्ळून तुमची फरपट करायला वेळ लावत नाहीत.

सृजनाचा बहर उमलता ठेवण्याकरता संवेदनांचं कोवळेपण जपणं ही देखील कलावंताकरता तारेवरची कसरतच  असते. तरच श्वासातली लय अन ध्यासातला ताल कवेत घेता येतो.स्पर्शाची भाषा अन अश्रुंची लिपी कळलीच नाही तर तिचा अनुवाद तरी कसा करणार? ज्या कलावंताना ही उमगते त्यांच्या निर्मितीत त्याचे कवडसे दिसत रहातात. सामान्यातल्या सामान्य रसिकाची नाळही त्या कलाकृतीशी सहज जुळते.अन कलाकृती अजरामर होवून बसते.अशा वेळी कलाकृतीचं यश कलाकृतीच्या पायाशी सोडून पुढ्ल्या प्रवासाला निघावं सोबतीला यशाची धग घ्यावी रग नाही.
--

No comments:

Post a Comment