Monday, April 29, 2013

फोकस

' मला कॅमेरा येतो , जसं तुम्हाला गाणं लिहिता येतं . बघा ' कॅमे - याच्या स्क्रीनवर माझा नुकताच क्लिक केलेला फोटो दाखवत तो म्हणाला . फोटो छान आला होता . पस्तिशी ओलांडलेला ' तो ' माझ्या एका मित्राचा आत्तेभाऊ .. त्याचं बूड कुठेच स्थिरावत नाही , म्हणून मित्राने त्याला माझ्याकडे पाठवलेलं . तो मला सांगत होता , ' आजवर तेरा नोकऱ्या बदलल्या , कारण कामासाठी पोषक वातावरण मिळतच नाही . आजूबाजूला तुमच्या उत्तम कामामुळे जळफळाट करणारे सहकारी , तर कधी लायकी नसूनही केवळ वशिल्यामुळे तुमच्या पुढे जाणारे काहीजण , किंवा तुमच्याहूनही कमी आणि अर्धवट ज्ञान असूनही काही मंडळींचा सतत होणारा उदो उदो . अशा विचित्र वातावरणात कसं काम करणार ?.. माझी मुळं त्या वातावरणात रुजायला नकार देतात . म्हणून मी नवीन कुंडी शोधतो .'

' अहो , पण अशा किती कुंड्या बदलणार ..? सारख्या कुंड्या बदलण्याच्या सवयीने तुमची वाढ खुंटते , हे लक्षात येतंय का तुमच्या ?'

' त्याला इलाज नाही हो . तुमचा मागच्या रविवारचा कुठेही रुजणारा पिंपळ मी वाचला . पण तो पिंपळाचा आदर्श मला लागू नाही . माझा आदर्श मी सध्या शोधतोय . त्यासाठी मला मदत करा ..'

' हो , करू काहीतरी ' असं म्हणून मी विषयच बदलला .

त्याच्या हातातला कॅमेरा घेऊन समोरच्या टेबलावरच्या बोनसायचा एक फोटो मी क्लिक केला आणि त्याला दाखवला . ' कसा वाटतोय ?' ' ओह , व्हेरी गुड .. छान व्ह्यू आहे .. बोनसाय , त्या मागचा पडदा , मग खिडकी ..!'

' अहो व्ह्यू नाही , मी त्या बोनसायच्या पानावरची नक्षी टिपायचा प्रयत्न केलाय ..'

' ओह आय सी ! अहो , मग लेन्स चुकली तुमची .. यात ते बोनसाय किती लहान दिसतंय . त्यात त्याची ती अगणित पानं .. तुम्हाला हवं असलेलं पान शोधून त्यावरची नक्षी या फोटोत टिपणं शक्य आहे का ?.. तुम्ही आत्ता जी वापरलीत तिला Wide Angle Lens असं म्हणतात आणि तुम्हाला हवाय तो Micro Mode' असं म्हणून त्याने दुसरी लेन्स सेट केली आणि एक फोटो क्लिक केला . त्याने केलेल्या क्लिकमध्ये नेमकं एकच पान आणि त्यावरची नक्षी इतकंच दिसत होतं . बाकी सगळं आऊट ऑफ फोकस होतं . त्या फोटोकडे पाहून मी त्याला म्हणालो , ' सापडला , तुमचा आदर्श ...!' कॅमेरा बाजूला ठेवून मला म्हणाला , ' कुठाय ? कुठाय ? यू मीन धिस बोनसाय ?'

' नाही , ही लेन्स .. नाही पटत ? बघा , ही बोनसायची पानं म्हणजे ऑफिसमधले तुमच्या कामावर जळफळाट करणारे सहकारी , झाडाचं खोड म्हणजे लायकी नसतानाही तुमच्यापुढे वशिल्याने गेलेली लोकं आणि या पानावरची नक्षी म्हणजे तुम्हाला दिलेली असाइनमेंट !! तुम्ही सतत Wide Angle लेन्स लावल्यामुळे पानावरची नक्षी जशी तुम्हाला मघाशी दिसलीच नाही तसं होऊन जातं . नक्षीऐवजी बाकी सगळ्या गोष्टी तुमच्या फ्रेममध्ये येतात आणि ती फ्रेम तुम्हाला नकोशी होते . Micro Mode वापरून पहा . म्हणजे फोकस ऑन युवर असाईनमेंट ... नको असलेल्या सगळ्या गोष्टी आऊट ऑफ फोकस असू देत . पण हा Micro Mode फक्त तुमचं जे ध्येय आहे त्याकरताच वापरायचा आणि प्रॉब्लेम्सकडे बघताना मात्र Wide Angle.. म्हणजे जगभरातले सगळे प्रॉब्लेम्स दिसतील . आणि त्यासमोर आपला प्रॉब्लेम क्षुल्लक ठिपक्यासारखा वाटू लागेल . थोडक्यात योग्य लेन्स सेट होणं महत्वाचं आहे .'

माझं म्हणणं त्याला कितपत पटलं माहीत नाही . पण काल संध्याकाळी माझा फोन वाजला . पलिकडून ' तो ' बोलत होता , ' गुरूजी लेन्स सेट झाली बरं का .. आणि रिझल्ट्स पण हंड्रेड अॅण्ड वन पर्सेंट .. अप्रतिम .. इतकंच सांगायचं होतं ...'

7 comments:

  1. क्या बात गुरु, तुझ लिखाण सुंदर, समजावण्यासाठी घेतलेलं कॅमेऱ्ययाच उदाहरण पण अफलातून.
    मुख्य म्हणजे कुणाच्याही आयुष्यात आपल्यामुळे जो बदल घडून येतो तो खूप आनंद देऊन जातो.

    ReplyDelete