Monday, April 29, 2013

आयुष्याला द्यावे उत्तर ...

संध्याकाळी सहजच चॅनल सर्फिंग करत होतो . डिस्कव्हरी चॅनलवर जीवघेण्या अपघातातून वाचलेल्या नंतर आलेल्या अपंगत्वावर जिद्दीने मात करून पुन्हा यशाचे शिखर गाठणाऱ्या काही मंडळींवर ती डॉक्युमेंटरी होती ... त्यात काही पाय गमावलेले , हात गमावलेले किंवा अन्य एखादा अवयव गामावलेले , तरीही कृत्रिम अवयव लावून पुन्हा तीच कला सादर करणारेही होते . मग त्यात काही नर्तक होते , चित्रकार होते , मॅरेथॉन धावणारे होते , ते सारं पाहून थक्क झालो आणि त्याचबरोबर माझ्यातला कवी गलबलला ... आणि त्या क्षणी एक कविता कागदावर उतरली . ते शब्द होते ....

असे जगावे छाताडावर आव्हानाचे लावून अत्तर
नजर रोखूनी नजरेमध्ये

आयुष्याला द्यावे उत्तर ...

त्या साऱ्या मंडळींची जिद्द , त्यांचा तो बाणा पाहून ते शब्द आले होते . ती संपूर्ण डॉक्युमेंटरी पाहून होईपर्यंत कविताही पूर्ण झाली होती .

नेमका दोन चार दिवसांनी मला ' इंद्रधनू पुरस्कार ' जाहीर झाला . ठाण्यातल्या एका मोठ्या सोहळ्यात ज्येष्ठ साहित्यिक शं . ना . नवरे यांच्या हस्ते तो पुरस्कार मला देण्यात आला . त्या पुरस्काराला उत्तर देताना मी नुकतीच लिहिलेली ती कविता सादर केली . लोकांची छान दाद मिळली . कार्यक्रम संपताच शं . ना . नवरे मंचावर आले आणि मला म्हणाले , ' एक गोष्ट मागितली तर मिळेल का ?' मी म्हटलं , ' बोला काय आज्ञा आहे ?' तर म्हणाले , ' आत्ता जी कविता ऐकवलीत , तीच हवी आहे . काय शब्द लिहीले आहेत हो ! अप्रतिम ! जीवनावर याहून उत्तम भाष्य मी याआधी कधीच ऐकलं नव्हतं .' माझ्याकरता ही मोठी दाद होती . मग लगेच एका कागदावर उतरवून ती त्यांच्या हवाली केली आणि म्हटलं , ' आज पहिल्यांदाच सादर केली ही कविता ...' ते म्हणाले , ' का ? अहो , ही कविता तुम्ही सादर करणं गरजेचं आहे . हे शब्द जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणं आवश्यक आहे . तेव्हा ही सादर करत चला यापुढे ..'

माझ्या आजवरच्या लोकप्रिय गाण्यांच्या जन्मकथा उलगडणाऱ्या माझ्या ' कसे गीत झाले ' या कार्यक्रमातही ती कविता मी आवर्जून सादर करतो आणि रसिकही या कवितेला भरभरून दाद देतात .

परवाच्या कार्यक्रमात मात्र निवेदिका गायिका योगिता चितळे हिने ठरल्याप्रमाणे त्या कवितेच्या संदर्भातला प्रश्न मला विचारला . कविता सुरू करणार तोच मी गोंधळलो . ' नजर रोखूनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर ' कसं म्हणू ? कारण कार्यक्रम अंधशाळेत होता . माझ्या प्रत्येक शब्दाला दाद देणारे ते रसिक दृष्टीहीन होते . त्यांच्या भावना दुखावल्या तर ?

मी भलतीच कविता म्हटली . योगिताचा गोंधळ उडाला होता . मी ती कविता विसरतोय , असं वाटून ती दर दोन गाण्यांनंतर त्या कवितेचा विषय काढत होती . अन मी भलतीच कविता म्हणून वेळ मारून नेत होतो . अखेर संधी पाहून मी हळूच तिच्या कानात माझा मुद्दा सांगितला . तिलाही तो पटला . हुशारीने सावरून घेत ती म्हणाली , ' आता वळूया कार्यक्रमाच्या शेवटच्या गीताकडे !' इतक्यात एक अंध विद्यार्थिनी उठली आणि तिने फर्माईश केली , ' गुरू ठाकुरांना विनंती आहे की , त्यांनी त्यांची ' नजर रोखूनी नजरेमध्ये ' ही आयुष्यावरची कविता सादर करावी . मला फक्त दोनच ओळी पाठ आहेत . खूप प्रोत्साहन देतात . मला पूर्ण कविता ऐकायची आहे .' माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले . क्षणाचाही अवलंब करता मी सुरुवात केली ...

पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना
हसू असावे ओठांवरती काळीज काढून देताना
संकटासही ठणकावूनी सांगावे ये आता बेहत्तर
नजर रोखूनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर .........!!

7 comments:

  1. नुसते कौतुक करायचे म्हणून नाही...अगदी खरच, मनापासून सांगावेसे वाटते की छान वाटते असे अनुभव, असे लिखाण आणि अशा कविता वाचल्यानंतर.

    ReplyDelete
  2. manatil bhawnanche tarang tumchya lekhnituni lihita tumhi.........

    ReplyDelete
  3. अरे याऽऽऽर !
    शब्द नुसते धुसफूसतात तूमच्या हातातून कागदावर यायला.... क्या बात...क्या बात... क्या बात.... सॅल्यूट त्या मुलीला जिने ही फर्माईश केली !

    ReplyDelete
    Replies
    1. वा! फारच सुंदर!!...आणि तुमचा अंध शाळेतील अनुभवहि..

      Delete
  4. वेबवर कविता विंदा करंदिकरांच्या फोटोसह पहायला मिळाली.खूप छान कविता !

    ReplyDelete