Wednesday, January 16, 2013

’देशभक्ती’ची नवी व्याख्या...?????



                 

     
सवलतीच्या दराचे सिलेंडर नको असलेल्यांची ’देशभक्त’ ही नवी श्रेणी तयार करण्याचा  प्रस्ताव पेट्रोलियम मंत्रालयाला सादर करण्यात आला आहे. ही बातमीच सामान्यांना पेटवणारी आहे. याचा अर्थ सवलतीच्या दरात सिलेंडर घेणारा सामान्य देशद्रोही का??? नाही म्हणजे सवलतीच्या दरात घेणा-यांत घोटाळेबाज भ्रष्टाचारी राजकारणी नेते येत असतील तर ठीक आहे पण अनाथाश्रम,वृद्धाश्रम वा तत्सम संस्थांचे काय? मध्यमवर्ग सोडाच दोन वेळच्या अन्नाला महागलेल्या गरीबांचे काय? हे सारे  देशद्रोही.  आणि  काळाबाजारी, गुंड, अनैतिक मार्गाने बक्कळ कमवणारे, ज्यांच्यावर हजारो खटले दाखल आहेत,ते मात्र  केवळ या एका गोष्टीने देशभक्त ठरणार? आणि ठरवणार कोण?? देशवासियांना देशोधडीला लावायचा विडा उचललेल्यां  या बाजार ना देशभक्तीची लेबलं वाटायचा मक्ता दिला कुणी?????
      आणि खरोखरच पेट्रोलिअम मंत्रालय जर हा प्रस्ताव मांडणार असेल तर घोटाळेबाज भ्रष्टाचा-यांना ठार करुन फासावर जाणा-यांना ’शहीद” दर्जा देऊन मरणोत्तर वीरचक्र देण्याचा प्रस्तावही एखाद्या मंत्रालयाने जनतेतर्फे मांडावा…….पण मांडणार कोण??????

लोकशाहीला लुचती लांडगे
पडे बापडी आजारी
देशभक्तीसही बटकी करुनी
बसवू पाहती बाजारी
माजावरले वळु पोसतो
खंत कुठे ही बोलावी
कणाच पिचता संसाराची
मोट कशी हो ओढावी?
कुणी न वाली सुग्रीव सारे
शोधित फिरती रामाला
लाचारांची लाळ विकाऊ
मोल न उरले घामाला
-    गुरु ठाकूर


No comments:

Post a Comment