Sunday, December 11, 2011

केशीवाऽऽऽऽ मादीवाऽऽ.....


"....म्हणून म्हणतो, आजच्या जगात मार्केटिंग शिवाय सारं फोल आहे बाबा.." -याच वर्षांनी अचानक भेटलेला माझा एक स्नेही मला पटवून देत होता. मार्केटिंग स्किल या विषयावर तो ठिकठिकाणी जाऊन व्याख्यानं देण्याचंच काम करतो आणि त्यातूनच कसा गलेलठ्ठ मोबदला मिळवतो याचीही साग्रसंगीत माहिती तो देत होता इतक्यात, "केशीवा मादीवा तुज्या नावाची रे गोडीवा " कानाचे पडदे फाटतील इतक्या मोठ्ठ्या आवाजात हे गाणं किंचाळत एक पंधरा सोळा वर्षाचा मुलगा डब्यात शिरला. हातानं गळ्यातली हार्मोनियम वाजवत होता.
काय त्रास आहे साला...!” माझ्या शेजारी बसलेला कपाळाला आठ्या घालत म्हणाला. रात्रीचे साडेअकरा वाजत होते. डब्यात तशी गर्दी नव्हती.साहजिकच त्याला फारसं काही मिळण्याची ही शक्यता नव्हती. तरीही वा-यावर पेंगणा-या एका पारशाने त्रासिक नजरेनं पहात झोपमोड करणारी ती ब्याद टळावी या हेतूने पाच रुपयाचं नाणं त्याच्या हातावर टेकवलं.
आजच्या जगात मार्केटिंग कसं महत्वाचं शस्त्र आहे हे जो मला पटवून देत होता. त्याने लगेच मुद्दा पकडला..”silly boys! मला सांगा ह्या पोरांनी हेच गाणं जर सुरात म्ह्टलं, तर त्यांना जास्त भीक नाही का मिळणार?”
कसं शक्य आहे? वर्षानुवर्षं गाणं शिकून reality show पर्यत पोहोचणा-या मुलांना जिथे सूर सापडत नाही. तिथे या पोरांना कुठला सापडायला?
पण मग शब्द तरी? जे गाणं आपण दिवसातून २०० वेळा गाणार त्याचे शब्द नीट पाठ नकोत? कसे पैसे मिळणार?...customer’s psychology ओळखायला हवी..साधं मार्केटींग टेक्निक आहे.. म्हणजे इथेही मार्केट स्टडी आलाच! थकून भागून घरी जाणा-या प्रवाशांना छान सुरेल असं गाणं ऐकायला मिळालं तर ते तशी बिदागीही देतील. कौतुकही करतील. हे त्याला कळायला हवं.मी नेहमी म्हणतो "तुझे आहे तुजपाशी परी तू प्रोसिजर चुकलासी" आणि याचंच नाही रे -याच जणांचा हाच घोळ असतो तो निस्तरून त्यांचं घोडं मार्गी लावण्याच काम आम्ही करतो.” मी म्हटलं,"मग याचंही घोडं मार्गी लाव की, तो तुला बिदागी नाही देऊ शकणार पण तेवढंच पुण्यकर्म होईल हातून!”
त्यालाही ते पटलं असावं त्याने कोप-यात चिल्लर मोजत बसलेल्या त्या पोराला बोलावलं. म्हणालाआवाज छान आहे तुझा. पण जरा शब्दांकडे लक्ष दे, सूर सांभाळ किती गोड होईल गाणं.तसं म्हटलंस तर मी दहा रुपये दिले असते..”
नक्की ?”
"प्रॉमिस ! " मार्केटींग महाराज म्हणाले.
दुस-या क्षणी त्या पोरानं डोळे मिटले सराईतपणे गळयातल्या हार्मोनिअमवर बोटं फिरवली अन सूर लावला.."रस्मे उल्फत को निभाये तो निभाये कैसे...”
आम्ही दोघं थक्क झालो. गाण्यातले शब्द, त्यातली एकेक जागा तो अचूक घेत होता. हा काय चमत्कार ? एव्हाना त्या पारशानं ही डोळे उघडले होते,
क्या बात है!” गाणं संपल्यावर आम्ही दोघांनी दहाच्या नोटा त्याच्या खिशात सरकवल्या. त्या पारशानंही त्याचं अनुकरण केलं.
अरे सोन्या, हे इतकं चांगलं गाता येतं ना? मग बेसुर का गातोस?”
धंद्यासाठी गावं लागतं साहेब”!
त्याच्या या वाक्यावर आम्ही दोघे उडालोच,"धंद्यासाठी म्हणजे ?"
माझा बाप छान पेटी वाजवायचा सुरेल, आई गायची, दोघं भीक मागायची पण तुम्हाला सांगतो लोक नुसतं ऐकत बसायचे, त्यानी अजून गावं म्हणून फर्माईश करायचे, अन आपापलं स्टेशन आलं की फुटकी कवडीही देता उतरुन जा्यचे. मी आईच्या कडेवर असल्यापासुन हे सगळं पाहिलंय. म्हणून मी हा असा फंडा शोधला.”
मी मार्केटिंग महाराजाना म्हटलंआलं का लक्षात? याच्या या बेसूर कर्कश्श गाण्यातच त्यांचं बिझनेस स्किल लपलंय.!”
काहीतरीच काय?” मला खुळ्यात काढ्त तो म्हणाला, “बेसूर गाण्यात कसलं आलंय बिझनेस स्किल?”
अरे बाबा, त्याना तू म्हणतोस तशी customer’s psychology समजलीय..कारण त्यांने ही मार्केट स्टडी केलाय.’
तो कसा?’
बघ,आता ही पोरं सुरात गायली तर लोक ऐकत बसणार, त्यानी अजून गावं म्हणून फर्माईश करणार त्यात याचा वेळ वाया जाणार शिवाय पैसे नाहीच, कारण पैसे मागायला आले की जो तो झोपेचं सोंग घेणार..खरंय की नाही?’
तो मुलगा मनापासून हसला आणि, "अगदी खरंय साहेब."म्हणून उतरुन पुढच्या डब्यात पळाला देखील.
पण त्याचा या कर्कश्श गाण्याशी काय संबंध?” गोंधळलेल्या मित्राने विषय अजून लावूनच धरला होता.
अरे,त्या तुलनेत कर्कश्श गाण्याचे अनेक फायदे आहेत,मुळात हा बेसूर गाऊ लागला की झोपमोड होते. मोबाईलवर बोलणा-यांना व्यत्यय होतो. कानसेनांना तर एका सुरेल गाण्याचा असा अघोरी छ्ळ ही सोसत नाही. त्यामुळे लवकरात लवकर ही ब्याद टळावी म्हणून लोक पटापट पैसे देऊन त्याला पुढे घालवण्याचा सोप्पा मार्ग निवडतात. त्यामुळे कमीतकमी वेळात अपेक्षित धंदा करुन हा पुढच्या डब्यात जायला मोकळा.”
माझ्या या विधानावर तो थक्क झाला. “क्या बात है! कमालीचं लॉजिक आहे त्याचं. पण हे तुमच्या कसं ध्यानात आलं? तुम्ही पण एमबीए वगैरे?”
मी मानेनेच नकार दिला.
मग नक्की तुम्ही खूप वाचत असणार..राईट?”
हो”...मी म्हटलं.
काय वाचता? I mean especially काय वाचायला आवड्तं?”
परिस्थिती..आणि त्यात भरडली जाणारी माणसं...ती बरंच काही शिकवून जातात. जसं आता हा शिकवुन गेला !” तो पुढे काही विचारण्याआधी मी दाराकडे सरकलो नकळंत मला नवं ज्ञान देणा्रा तो "गुरु" प्लॅट्फॉर्मवर दिसेल या आशेने!!

8 comments:

 1. गुरु दादा तुझा नविन गुरु शोधण्याची पद्धत आवडली ..
  तू जे काही लिह्तोस.. मी सर्व वाचतो.म्हणजे जे माझ्या पर्यंत पोहचते ते . पण त्यातल्या त्यात .
  जे काही अनुभव येतात .. तुला ,, ते अशेच आम्हाला
  सांगत जा..

  तुझ्या मोठ्या विश्वातला तुझा एक चाहिता


  ज्ञानदीप सागर ..(संदीप पाटिल.)

  ReplyDelete
 2. तू अजूनही गुरू शोधतोस ह्यातच तुझा मोठेपणा आहे....
  संवेदनशीलता जपणं सर्वांनाच जमत नाही.... ती टिकवावी लागते हे ह्या तुझ्या लेखातून अगदी पोहोचलं... !!

  ReplyDelete
 3. very well written... was very fruitful to b diverted to ur blog... they are as good as ur songs....

  ReplyDelete
 4. मार्केटातल मार्केट आणि बुकातल मार्केट ह्यातला फरक जगता जगता दाखवला.

  ReplyDelete
 5. “परिस्थिती..आणि त्यात भरडली जाणारी माणसं...ती बरंच काही शिकवून जातात.
  यात आला सगळ.धन्यवाद गुरु ठाकूरजी

  ReplyDelete
 6. गुरु, आपला हा किस्सा अक्षरशः डोळ्यासमोर उभा राहतो. त्याच बरोबर आपल्या मधला फुकटा माणूसही डोळ्यासमोर येतो, जो गाणे ऐकतो बंद डोळ्यांनी, पैसे न देण्यासाठी. माणसाच्या दांभिकतेवर अचूक प्रहार केलात आपण. आपल्यातल्या गुरूला सलाम!

  ReplyDelete
 7. हम्म...खरंच "गुरू" निघाला की हा (बे)सूरा गायक..
  खूप छान मांडलाय अनुभव !!!

  ReplyDelete
 8. khupach mast ahe anubhav, Shakya ahe ki ha anubhav khup janana ala pan asel pan dada to tumi pahila tya najaretun koni pahila pan nasel n tasa lihita pan ala nasel.
  Khup chaan watala n GURU Chi concept pan TANTOTANT PRATYAYAS ALI.
  dhanyawaad dada tumchyamule ek mast anubhavacha GURU BHETLA

  ALL THE BEST

  ReplyDelete