Sunday, December 11, 2011

मर्कंटायन!!!!परवा संध्याकाळी घरी आलेल्या एका मित्राच्या दोन वर्षाच्या चिरंजीवांच्या हाती माझ्या लहानपणचे मी जपलेलं एक गोष्टीचे पुस्तक लागलं. अन त्याने हट्ट्च धरला माझ्याकडे की गोष्ट वाचून दाखवा. मित्रालाही मग चेव चढला. ’वाच रे वाच.. इतका आग्रह करतोय तो तर..’ माझा नाईलाज झाला. वाचणं भाग होतं.

गोष्ट तशी जुनीच आहे. आटपाटनगर होतं, तिथल्या राजाची.. राजा तसा कनवाळू, प्रजेची काळजी घेणारा. कुठे काय घडतंय याची माहिती ठेवणारा. प्रजेची खरी काळजी असल्यामुळे वेष बदलून तो नगरातून नियमित फेरफटका मारत असे. एके दिवशी असाच फेरफटका मारत असताना एका ठिकाणी एका डोंबा-याच्या खेळापाशी त्याची पावलं थबकली. कारणही तसंच होतं. तो डोंबारी एका माकडाला आज्ञा देऊन अनेक कसरती करुन घेत होता. अन ते बेटं देखील त्याच्या सगळ्या आज्ञा पाळत आवाक्यापलीकडच्या करामती लीलया करुन दाखवत होतं. बघे थक्क होते. राजाला ते माकड फारच आवडलं. त्याला वाटलं याची खरी जागा इथे रस्त्यावर नाही राजमहालात आहे. खेळ संपताच त्याने त्या डोंबा-याजवळ तशी इच्छा व्यक्त केली. परंतु त्याचे उदरनिर्वाहाचे तेच साधन असल्याने आणि आपल्याकडे ते मागणारा प्रत्यक्ष या नगराचा राजा आहे हे न ओळखल्यामुळे राजाला नकार देऊन तो निघून गेला. मग दुस-या दिवशी राजाने त्याला दरबारात बोलावले. त्याला योग्य तो मोबदला दिला, अन माकड ताब्यात घेतले.

हळूहळू ते माकड त्या महालात रुळलं. त्याच्या लीलांनी राजाही खूश झाला. राजा जसा वागे, चाले, हावभाव करी, तशी त्याची अचूक नक्कल ते करी. शिवाय एखाद्या स्वामीनिष्ठ चाकराप्रमाणे ते राजाची सेवाही अन मनोरंजनही करु लागलं. एका दुपारी राजा आपल्या बागेत फिरत असताना एक भला मोठा नाग फणा काढून त्याच्या समोर आला ज्याला पाहून अंगरक्षकासह सगळ्यांचीच गाळण उडाली. पण त्या माकडाने मात्र क्षणाचाही वेळ न लावता नागाला उचलून लांब भिरकावले. राजाचे प्राण वाचवले. राजाने फरमान सोडले, आजपासून हे मर्कटराव माझे अंगरक्षक! ठरल्याप्रमाणे त्याने आपला आदेश अमलातही आणला. त्या रात्री त्या अंगरक्षकाची गच्छंती हो त्याच्या जागी मर्कटरावांची नेमणू झाली. साहजिकच अंगरक्षकाचे सारे अधिकार, सारी सामग्री त्याला बहाल झाली. त्या रात्री राजा निर्धास्त झोपला असताना एक माशी त्याच्या डोक्यावर भिरभिरु लागली. माकडाने तिला हाकलण्याची शर्थ केली. पण माशी काही जाना. माकड ईरेला पेटले. त्याने तलवार उपसली अन ती दांडपट्ट्यासारखी चालवू लागले. त्याने पाहिले की माशी अलगद राजाच्या नाकावर बसली आहे. माकडाचा संताप झाला. मी असताना तुझी ही हिंम्मत? त्याने तलवार फिरवली अन माशी ऐवजी सप्पकन राजाचे नाक उडाले. राजा किंचाळत उठला. माकड भांबावले अन तलवारीसह पळत सुटले. राजाने त्याला पकडायचे फरमान दिले. पण आता त्याच्याकडे अधिकाराची तलवार होती.

तिचा हुशारीने वापर करत ते पसार झाले. राजा कापलेल्या नाकासह शोक करत बसला. त्याला आपली चूक उमगली पण फार उशीर झाला होता.....

’किती बालीश गोष्टी होत्या रे आपल्यावेळी..!! गोष्ट काल्पनिक असली म्हणून काय झालं ? अर्थ आहे का याला? असा मुर्ख राजा असेल का कुठे? जो एखाद्या माकडाची लायकी न ओळखता नुसता त्याच्या मर्कटलीलांनी भारावू जा त्याला इतक्या मोठ्या हुद्द्यावर बसवेल?’ माझी गोष्ट वाचुन पुर्ण होण्या आधीच मित्र ओरडला

मी म्हटलं,’ अरे मला तर ही आजची गोष्ट वाटते. कदाचित काळाच्या पुढचा विचार करुन तेव्हा लिहीली असावी लेखकाने. कौतुक आहे त्याचं !!!’

मित्र हबकलाच!,’ म्हणजे? असा राजा आहे? ही गोष्ट खरी झाली? कुठे? कोणत्या देशात?’

’आपल्याच देशात! तुला नाही माहित??’

’नाही रे...आपल्या देशात कुठे आला राजा....??’

मतदार राजा’!! अरे वेड्या म्हणजे आपणच सारे....!! गेली काही वर्ष जे काही करतोय ते याहू वेगळं काय आहे?? केवळ त्यांच्या आश्वासनांच्या दिखाऊ ­­चाळयांनी भारावून जात आपण किती जणांना त्यांची लायकी, गुणवत्ता, पात्रता, काहीही पडताळून न पाहता, न ओळखता देशाच्या, राज्याच्या, शहराच्या जबाबदारीची महत्वाची अधिकारपद बहाल करतो. अन पाच वर्षांकरता झोपायला मोकळे होतो. मग आम्ही विश्वासानं डोळे मिटल्यावर त्यांनी त्या अधिकाराच्या तलवारींचा गैरवापर करुन कोट्यावधींचे घोटाळे करुन आपलीच नाकं कापली की आपण खडबडून जागे होतो अन बोंब ठोकतो पकडा पकडा. पण दुस-याच क्षणी आपल्या लक्षात येतं की अरे! आता त्यांच्या हातात आपणच दिलेल्या अधिकारांच्या नंग्या तलवारी आहेत. आणि आपल्या हाती पुढल्या निवडणूकीपर्यंत जीव आणि कापलेलं नाक मुठीत घेऊन पळण्याखेरीज दुसरं काहीच नाही....

4 comments:

  1. >>>>आणि आपल्या हाती पुढल्या निवडणूकीपर्यंत जीव आणि कापलेलं नाक मुठीत घेऊन पळण्याखेरीज दुसरं काहीच नाही....<<<<<

    ho... asach tar suru ahe sara....!! very true...!!!

    ReplyDelete