Friday, September 24, 2010

गणपती गेले गावाला..चैन पडेना आम्हाला..!!!




' श्रीगणेशाय नम:' अशी अक्षरं पाटीवर लिहून अक्षरओळखीचा श्रीगणेशा करायच्या कितीतरी आधीपासून मी बाप्पाच्या प्रेमात होतो. त्याच्या त्या लोभस रूपाने मला नकळत त्या वयात भुरळ घातली होती. हातात खडू घेऊन घराच्या भिंतीवर मी गिरवलेली पहिली आकृती गणपतीबाप्पाची होती.आणि केवळ तेवढ्या एका कारणाने नव्याको-या पेंट वर केलेल्या त्या रेखाटनाबद्द्ल धपाटे मिळण्या ऐवजी माझे भरभरुन कौतुक झाले होते . तेव्हापासूनच आमच्यात एक छान असं नातं जुळलंय. तो सतत माझी बाजू घेऊन माझी पाठराखण करायला माझ्यासोबत आहे असं सतत वाटत राहतं.

माझ्या आईची गणपतीवर प्रगाढ श्रद्धा. मी अतिकर्मकांड करणाऱ्यांपैकी किंवा तासन्तास रांगा लावून विशिष्ट ठिकाणीच दर्शन घेणा-यां पैकी नाही. मला माझा बाप्पा यत्र, तत्र सर्वत्र भेटतच राहतो. काही त्यांच्या बाबतच्या आख्यायिकांमुळॆ देवांची जरब वाटते,कट्टर सोवळं-ओवळं यामुळे काही देवांचा धाकही वाटतो. पण गणपती या दैवताबद्दल मात्र नेहमी आपुलकीच वाटते. यामुळेच असेल अबालवॄद्धांना त्याची ओढ वाटते अन कलाकरांना तर त्याचं जबर आकर्षण असतं. मीदेखील माझ्या उमेदीच्या काळात जे जे काही केलं त्यात गणपती होताच. चित्रकला, कॅलिग्राफी, फोटोग्राफी अशा विविध माध्यमांतून काम करताना गणरायाची ही रुपं फारच जवळची वाटली. गंमत म्हणजे गीतलेखनाला सुरुवात केल्या-केल्या चॅनलवरील एका कार्यक्रमासाठी गणेशपुराणातले काही प्रसंग गीतरुपानं लिहायचे होते. त्या निमित्ताने गणेशपुराण वाचलं. हातून जे काही काम झालं त्याला मान्यवरांनी दाद दिली. तेव्हा खरंच बाप्पा माझ्या पाठीशीच नाही तर सोबतीलाही आहे अशी खात्री मला पटली. आताही मी कोकणातल्या घरच्या गणपतीला जातो. हातात कितीही महत्वाचं काम असेल तरी मी हे जाणं चुकवत नाही. सोवळं वगैरे नेसून गणपतीची मनोभावे पूजा करतो.आणि एकच विनवतो कलवंत म्हणून जन्म दिलायस हातून उत्तम कलाकृती निर्माण होत राहू दे्त .अन पाय सदैव जमिनीवर राहू देत.बस्स.एका नाटकाकरता लिहीलेल्या नांदी करत मी लिहीलेल्या ओळींतही हीच विनवणी होती.
तू गणनायक तूच गणपती
सकल कलांचा तूच अधिपती
खेळ मांडतो रंग चढूदे..मान्य करी स्तवना..
स्वीकारी वंदना शिवसुता स्वीकारी वंदना..

या साऱ्यामुळे असेल, गणेशोत्सव हा माझा अत्यंत आवडता उत्सव. दिवाळीपेक्षाही गणशोत्सव मला खूप आवडतो. लहानपणी वडिलांबरोबर गिरगाव, लालबागला गणपतींचे देखावे, रोषणाई, गणपती बघायला जायचो. आता मात्र गणपतीचे आठ-नऊ दिवस कोकणात असल्याने मुंबईतला सार्वजनिक गणेशोत्सव मिस करतो. मुंबईतलं ते दहा दिवस प्रचंड भारुन टाकणारं वातावरण, सर्वत्र दिसणारी त्याची अगणित रुपं वेड लावंतात. लहानपणी मी अनंतचतुर्दशीला घरात दडून बसे. कारण बाप्पाचं विसर्जन ही गोष्ट मला यातनामय वाटत असे. आज ते बालवय नाही, ती निरागसताही राहिली नाही. स्वत:च्या अनेक प्रश्नांची उत्तरं शोधण्याइतपत मी बुद्धीजीवीही झालोय. तरीही आजही विसर्जनाच्या वेळी माझे डोळे अगदी तसेच पाणावतात. असं का? या प्रश्नाचं उत्तर मात्र माझं मलाच सापडत नाही.

7 comments:

  1. || श्री गणेशाय नमः ||


    दादा.....
    "काही बोलायाचे आहे...." मुळात हे शीर्षकच मला खूप आवडल. तू अगदी मोजक्या आणि भावपूर्ण शब्दांत स्वतःचं मन मोकळ केलस. खरच गणपती बाप्पा म्हणजे अबालवृद्धांच लाडक, आराध्य दैवत. किती विविध रूपांत गणराज आपल्याला भेटतात. त्याचं कोणतही रूप असो अगदी "बाळ गणेश" असो वा सिंहासनावर विराजमान झालेली भव्य मूर्ती असो.......आपल्या लाडक्या बाप्पा बद्दल नेहमीच आपुलकी वाटते हे मात्र तितकच खर. गणेशोत्सव असो वा दर महिन्यातील संकष्टी मन अगदी त्या गौरीसुताच्या चरणी लीण होत. खूप आधार वाटतो बाप्पाचा.
    ट्रेकिंग निम्मित "सुधागड"ला गेलो होतो तेव्हा अष्टविनायकांपैकी आठवा "पाली"चा "श्री बल्लाळेश्वर" याच्या दर्शनाने धन्य झालो. आणि मुखातून नकळत काही ओळी पुटपुटलो.....

    रूप पाहता सुंदर
    सुखावले लोचन....
    पाली गावात नांदतो
    गौरीसुत गजानन...

    मूर्ती असे हि ठेंगणी
    रुंद शेंदूर चर्चित...
    डोई शोभतो मुकुट
    रत्न माणिक जडित..

    नयनी शोभती हिरे
    रूप किती हे साजिरे....
    हाती मोदक घेउनी
    उभे मूषक गोजिरे...

    बाळ बल्लाळ आठवा
    भक्ती मनात साठवा...
    - सुरज उतेकर

    दादा...असंच काही बोलत राहा....!
    आभारी आहे.


    - सुरज उतेकर

    ReplyDelete
  2. @गुरु: तुझे देवाबाबतचे बरेच विचार पटतात. देव हा कुठल्या एका ठिकाणीच किंवा कुठल्यातरी विशिष्ट पद्धतीने आराधना केल्यावरच "भेटतो" असं मलाही वाटत नाही. तू म्हटलंयस की आजही गणपतीचं विसर्जन होताना तुझे डोळे पाणावतात. त्याचं कारण तुला गणपतीविषयी वाटणार्‍या आपुलकीत असेल. आपलं माणूस दूर जात असेल तर हुरहूर वाटल्याशिवाय रहात नाही. ती व्यक्ती परत येणार आहे, आपण त्यांच्या संपर्कात रहाणार आहोत इत्यादी "logical" गोष्टी अशावेळी सुचत नाहीत आणि आपली समजूतही काढू शकत नाहीत. तुझंही बाप्पाच्या बाबतीत तसंच असेल कदाचित :).

    ReplyDelete
  3. छान आहे लेख !
    मला वाटत देवाचा दर्शन घ्यायला देवळात जायची गरज नसते ! देवाच फ़क्त मनापासून नामस्मरण केल तरी दर्शन घडतं!
    गणेश उत्सव ..जन्म आणि मृत्यु च चक्र असाच सुरु राहणार हेच मला दर्शवता.

    ReplyDelete
  4. गुरु, निस्सिम भक्ती हातून खूप काही उत्तुंग काम घडवत असते, याचा पुन:प्रत्यय हा लेख वाचताना आला.

    तमाम सेलिब्रिटीज जेव्हा मुंबईतल्या "राजा" किंवा तत्सम ग्मॆमरस गर्दीत व्हिआयपी दारातून प्रवेश मिळवत दुस-या दिवशी पेज थ्री वर छापून येतात.. तेव्हा "गुरु ठाकूर" नावाचा एक मनस्वी कलाकार आपल्या गावातल्या पिढीजात गणपतीची सोवळं नेसून पूजा करत असतो.

    विद्याधिपती गणराय तुझ्यावर उगाच प्रसन्न नाहीत, तुझ्या साधनेचा तो प्रसाद आहे.

    ReplyDelete
  5. namaskar guru.evdhe divas vataych fakt aplyalach ganapati bappachi odh ahe.tyachya janyachi hurhur ahe pan tumchyasarakha thor kalavant jeva asech kahise mhanato teva agdich ekaki vatat nahi.hi tashi agdi swabhavik pratikriya ahe ji prattek ganesh bhaktachya manat dataleli asate.aso.ya nimittane share tar karata ala.dhanyawad.
    nandini.pune.

    ReplyDelete
  6. Bhakti cha pur jevha hridayat datato.tevha to nayanatun baher yeto tylach aapan ahru mhanto.

    ReplyDelete
  7. गणपतीवर लहानपणापासून श्रद्धा.
    मी गणपतीला कोकणातच जाणे पसंत करतो... पळ काढतो मी मुंबईतून...
    कारण ज्या मातीत आपली नाळ पुरलेली असते तिथली ओढ ही कायम असतेच..
    कदाचित याच कारणास्तव मी लालबाग़ राजाच्या दर्शनास गेलो नाही अजून पर्यंत...
    गाडीत असताना कधी एकदा घरी पोहोचतो आणि त्याच्या आगमनाची तयारी करतो असे झालेले असते. मन नेहमी अस्थिर त्याच्या आगमनास...
    रोज त्याच्या समोर साग्रसंगीत पूजा. शिवाय केळीच्या पानात उकडीचे मोदक, वरण भात, पाच प्रकारच्या भाज्या असा सुंदर बेत... शहरात नाही अनुभवता येत...
    रात्र भर प्रत्येकाच्या घरी जाउन भजन करण्याची तर मजाच निराळी ....
    अन हे सर्व पाहत असताना निरोपाची वेळ येते.... मूर्ती डोक्यावर घेउन विसर्जन करण्याची जी मजा आहे ती इतर कोणत्याच विसर्जनात नाही.
    गणपतीच्या चेहेऱ्यावर असलेले आगमनाचे तेज आणि विसर्जनाच्या वेळी कमी झालेले तेज अनुभवले आहे... निदान गेली काही वर्षे तरी.
    जड़ अंत:करणाने निरोप देऊन आम्ही सुद्धा येतो अमुच्या शहरात...

    ReplyDelete